बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: November 1, 2015 00:05 IST2015-10-31T23:22:43+5:302015-11-01T00:05:56+5:30
दुचाकीवरील मुलगीही जखमी : पोलिसांत गुन्हा दाखल, पावशीतील घटना

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
कुडाळ : तालुक्यातील पावशी-केसरकरवाडी येथील वळणदार रस्त्यावर एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार संतोष सावंत (वय ४५) हा तरूण जागीच ठार झाला. त्याच्या मागे बसलेली मुलगी जखमी झाली. एसटी बसचालकाच्या बेपवाईमुळेच हा अपघात झाल्याचे सांगत लोकांनी एसटी चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी चालकांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह जाग्यावरून हालविणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
मूळ आवळेगाव-वरचीवाडी येथील संतोष सावंत हे आंबडगाव-टाळंबा येथे ड्रायव्हर या पदावर नोकरीला असून, ते पत्नी व मुलीसोबत टाळंबा कॉलनीत राहत होते. त्यांची मुलगी कुडाळ येथे नववीत शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी ते मुलीला कुडाळ येथे शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. सव्वासातच्या सुमारास ते केसरकरवाडी येथील वळणदार रस्त्यावर आले असताना समोरून येणाऱ्या कुडाळ-केरवडे एसटी बसची त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली व गटारात फेकली गेली. संतोष सावंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू
झाला. (प्रतिनिधी)