Gram Panchayat Election: सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये पहिल्या दिवशी 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल!, पहिला अर्ज कुणाचा?
By सुधीर राणे | Updated: November 28, 2022 18:40 IST2022-11-28T18:36:35+5:302022-11-28T18:40:41+5:30
उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने गावागावातील वातावरण तापू लागले

Gram Panchayat Election: सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये पहिल्या दिवशी 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल!, पहिला अर्ज कुणाचा?
कणकवली: कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आज, सोमवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने गावागावातील वातावरण तापू लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी कणकवली तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आर.जे.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनुसार ३८ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. ऑनलाईन अर्ज दाखल करून त्यानंतर त्याची प्रतही सादर करण्यात आली.
वनसकर यांचा पहिला अर्ज दाखल
कणकवली तालुक्यातील कलमठ प्रभाग क्रमांक ६ मधून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून प्रशांत भालचंद्र वनसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तालुक्यात त्यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे. तसेच शिवडाव येथील प्रभाग २ मधून सर्वसाधारण जागेसाठी मारुती मनोहर म्हाडेश्वर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी दिली.
दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच तहसीलदार कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कागदपत्राबाबत माहिती घेण्यासाठी तसेच आपल्या शँकाचे निरसन करून घेण्यासाठी गर्दी केली होती.