सावंतवाडीत झाड कोसळून दोघांचा मृत्यू; सर्वपक्षीय नेते आक्रमक, मंत्री केसरकरांकडून मदतीचे आश्वासन
By अनंत खं.जाधव | Updated: September 27, 2023 17:33 IST2023-09-27T17:32:36+5:302023-09-27T17:33:27+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी मंगळवारी रात्रीच्या वेळी झाड पडून दोघा युवकांचा मृत्यू झाला होता या युवकांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली ...

सावंतवाडीत झाड कोसळून दोघांचा मृत्यू; सर्वपक्षीय नेते आक्रमक, मंत्री केसरकरांकडून मदतीचे आश्वासन
सावंतवाडी : सावंतवाडी मंगळवारी रात्रीच्या वेळी झाड पडून दोघा युवकांचा मृत्यू झाला होता या युवकांच्या कुटुंबियांना अर्थिक मदत दिली जावी या मागणीसाठी बुधवारी सर्वपक्षीय नेते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी नगरपरिषद प्रशासनास धारेवर धरत जोपर्यंत पीडित कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला.
अखेर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे नगरपरिषद सभागृहात दाखल होत या युवकांच्या कुटुंबियांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार तसेच मी व्यक्तिगत मदत करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वपक्षीय नेते शांत झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, तहसिलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच विद्युत विभागाचे कुमार चव्हाण, नायब तहसिलदार मुसळे तसेच सर्व पक्षीय नेते आदीसह टेम्पो चालक मालक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बँक संचालक महेश सारंग, अॅड.निलिमा गावडे, आनंद नेवगी यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नगरपरिषदेला जाब विचारला. तसेच विद्युत विभागाचा गलथान कारभार लोकांच्या जीवावर कसा काय बेततो याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान एवढी मोठी घटना घडूनही बैठकीला तहसिलदार श्रीधर पाटील उपस्थित नसल्याने अनेकांनी त्यांच्यावर रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.
या घटनेची माहिती मिळताच मंत्री दीपक केसरकर यांच्यासह आमदार वैभव नाईक नगरपरिषद सभागृहात दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी मुख्यमंत्री निधीतून मदत तसेच व्यक्तिगत मदत देणार असल्याचेही सांगितले. तसेच मृतांचे नातेवाईकांना धीर देत सांत्वन केले.