खवले मांजराच्या खवल्याची तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात, सावंतवाडी वनविभागाची कारवाई
By अनंत खं.जाधव | Updated: November 8, 2023 19:16 IST2023-11-08T19:05:53+5:302023-11-08T19:16:04+5:30
सावंतवाडी : बांदा येथे खवले मांजराच्या खवल्याची तस्करी होणार असल्याचे माहिती मिळाल्याने वनविभागाकडून आज, बुधवारी दुपारी बांदा प्राथमिक आरोग्य ...

खवले मांजराच्या खवल्याची तस्करी प्रकरणी दोघे ताब्यात, सावंतवाडी वनविभागाची कारवाई
सावंतवाडी : बांदा येथे खवले मांजराच्या खवल्याची तस्करी होणार असल्याचे माहिती मिळाल्याने वनविभागाकडून आज, बुधवारी दुपारी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. नारायण सावळाराम नाईक (वय ४८) सद्गुरू मारुती नाईक (५२) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. यावेळी दोन किलो वजनाची खवले मांजराची खवल्यासह दुचाकी ताब्यात घेतली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खवले मांजराच्या खवल्यांच्या विक्रीचा व्यवहार होणार अशी गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाची टिम सज्ज झाली होती. बांदा येथे दुपारच्या सुमारास वन विभागाच्या टीमने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात सापळा रचला होता. त्याचवेळी संशयित आरोपी नारायण नाईक, सद्गुरू नाईक हे दोघेजण दुचाकी वरून येऊन खवल्यांचा व्यवहार करताना वन विभागाच्या सापळ्यात सापडले.
ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री. एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे, अप्पासो राठोड यांच्या पथकाने केली.