सच्चा कार्यकर्ता भगवा खांद्यावर घेणार नाही
By Admin | Updated: July 14, 2014 23:33 IST2014-07-14T23:32:42+5:302014-07-14T23:33:47+5:30
सामंत : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

सच्चा कार्यकर्ता भगवा खांद्यावर घेणार नाही
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी पक्ष सोडण्याच्या निर्णयाने पक्षाचे काही प्रमाणात नुकसान होईल हे खरे आहे; परंतु अख्खी राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाईल, अशी स्थिती नाही. सच्चा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भगवा खांद्यावर घेणार नाही, असा दावा राज्यमंत्री उदय सामंत यांनी केला.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनच्या सभागृहात आज, सोमवारी राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, सावंतवाडी नगरसेवक राजू बेग, वेंगुर्लेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रसन्ना कुबल, कुडाळ सभापती शिल्पा घुर्येसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये विलास गावकर, द्वारकानंद घुर्ये, बी. डी. कांबळी आणि इतर कार्यकर्त्यांनी सामंत यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. बाळा भिसे यांनीही म्हणणे मांडले.
यानंतर पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले, आजच्या बैठकीला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभल्याने कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भगवा हातात घेणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. किंबहुना आजही राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष आहे. आमदार केसरकर हे ज्येष्ठ असल्याने त्यांच्यावर टीका करणार नाही. मित्रपक्षाबद्दलच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यावर आपण पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू; परंतु मित्रपक्षाने मित्रासारखे वागायला हवे, यासाठी आम्ही यापुढे पावले उचलू. (प्रतिनिधी)