रस्ते तुडवताना मानवताच जपली
By Admin | Updated: November 24, 2014 23:04 IST2014-11-24T22:21:32+5:302014-11-24T23:04:55+5:30
भाऊ जोशी : वाटेवर काटे आले असतील; पण सेवाधर्म सोडू नका, सेवेतून मिळणारी अनुभूती परमेश्वरापर्यंत पोहोचवेल --संवाद

रस्ते तुडवताना मानवताच जपली
उरलो उपकारापुरता...
कोकणात पन्नास वर्षांपूर्वी रूग्णसेवा देणे हे आव्हान होते. रस्ते नव्हते, दळणवळणाची साधने नव्हती. संपर्क होत नव्हता. अशावेळी माणसामाणसांमधील नाते विश्वासाने जपले. नि:स्वार्थी भावनेने काम करणारी मंडळी, त्यात तरूण शिकलेला आला की, त्यातून अपेक्षा वाढायच्या. अशिक्षित समाजाला रोग आणि निदान सांगणे व सांगितले तर त्यातून त्याच्या संतापाला क्रोधाला सामोरे जाणे हे दिव्यच. हे दिव्य आम्ही पार पाडले. आजच्या पिढीला अभ्यासासाठी क्षेत्र विस्तारली असली तरी त्यांच्यामध्ये क्षमता सिध्द करायला भरपूर वाव आहे. स्पर्धा असली तरी प्रामाणिकपणे काम करून अप्रामाणिक गोष्टी न करण्यावर भर दिला तर त्यातून सत्याचा विचार निर्माण होईल व प्रत्येकाला अभिप्रेत असलेले मनस्वी समाधान मिळेल. आजच्या तरूणांनी हे करावे व सेवाधर्म जागवावा, असे विचार धन्वंतरी डॉ. भाऊ जोशी यांनी मांडले आहेत.
जिल्ह्यात जिथे एस. टी. नव्हती, जगण्यासाठी जिथे लोकांना केवळ दारिद्र्याशीच संघर्ष करावा लागत होता, पै-पैशांसाठी काबाडकष्ट करावे लागत होते आणि दूर... कोसो दूर... चालूनही एखादा आजार झाल्यास उपचार घेता येत नव्हते, अशावेळी माणसांच्या भेदक नजरा, राग, कुपोषण, मोठे कुटुंब व उदरनिर्वाह कसा चालवायचा, या आव्हानात्मक परिस्थितीत एखादा डॉक्टर वाटा तुडवत रूग्णापर्यंत पोहोचला, तर तो देवदूतच ठरायचा. त्यावेळचे हे प्रेम मी आज विसरू शकत नाही. त्यावेळची निष्ठा, माध्यमे आणि दळणवळणाची साधने गावापर्यंत पोहोचलेली नसताना करायला मिळालेली रूग्णांची सेवा हाच माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. आज पाय थकले असले तरीही त्या व्यक्तिरेखा जगायला कसे सामर्थ्य देतात, याची अनुभूती देतात.
आडिवरे (ता. राजापूर) येथील डॉ. भालचंद्र तथा भाऊ जोशी हे गरिबांचे डॉक्टर म्हणून गेली पन्नास वर्षे या जिल्ह्यात प्रसिध्द आहेत. या जिल्ह्याला भौगोलिक संकटांनी त्यावेळी घेरलेले होते. रस्ते, पाणी, एस. टी., शाळा, आरोग्यविषयक सुविधांची वानवा. अशा काळात भाऊंनी गावात प्रवेश केला आणि गावातील धन्वंतरी म्हणून त्यांना लौकीक मिळाला. साहित्यिक, विनोदी वक्ते, शिक्षण, सहकार, सभा संमेलने, परिषद, नट, रंगभूमी, सरकारचा उच्चपदस्थ अधिकारी, गावात पश्चिम महाराष्ट्रातून नव्याने आलेले शिक्षक दाम्पत्य, समाज बांधव, शाळा तपासणीसाठी गावात येणारे अधिकारी यांची भाऊंशी मैफल जमायची. मूळ पेशा वैद्यकीचा असला तरीही कुटुंबातल्या प्रत्येक समारंभात भाऊंचा वाटा हा महत्त्वाचा. तो त्यांनी चालविला. आज त्यांनी पेशातून निवृत्ती घेतली नसली आणि वयाने थकले असले तरी त्यांचा उत्साहाचा स्रोत कमी झालेला नाही. आज अनेक संस्थांच्या उभारणीत काम करताना त्यांनी नव्या पिढीला संदेश दिलाय तो जगायला शिकविणारा आणि नव्याना प्रेरणा देणारा ठरलाय.
आज आमच्यापेक्षा हुशार आहेत. त्यावेळीही होते. मात्र, आम्ही तडजोड केली नाही, गुणवत्ता सिध्द करताना गरज पडेल तेथे पोहोचलो आणि रूग्णांच्या आयुष्यात प्रकाशवाटा दाखविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न करताना पेशाशी बेईमानी, गरिबांना कष्टातून उभी केलेली मनाची श्रीमंती जोपासायला विसरलो नाही, विद्यार्थ्यांना, अडचणीत सापडलेल्यांना औषधांसाठी पैसा महत्त्वाचा मानला नाही, उपचार करून त्याला समाधान मिळेल असेच प्रयत्न करीत राहिलो.
भाऊंच्या जीवनशैलीत त्यांनी आयुष्यभर चिंतन, मनन, वाचन, कविता, लेख, कादंबरी, नाटक, विनोद यांची साथ केली. पु. ल देशपांडे, चिं. वि. जोशी, राम गणेश गडकरी यांच्या वाङयाचा ते रसिकतेने आनंद घेतात. आज त्यांचा सहभाग, नेतृत्व असलेल्या अनेक संस्था या भागात आहेत. त्यांनी प्रत्येक संस्थेत काम करताना संस्था, कार्यक्षेत्र मोठे केले. मात्र, त्यांनी सर्वांना बरोबर घेताना प्रत्येकाला सांगितले जीवनात जे क्षेत्र स्वीकाराल, त्याला प्रामाणिकपणे न्याय द्या.
- धनंजय काळे