शासनाच्या योजना घराघरांत पोहोचवा
By Admin | Updated: January 29, 2015 00:19 IST2015-01-28T23:31:23+5:302015-01-29T00:19:24+5:30
दीपक केसरकर : जिल्ह्यातील विविध पुरस्कारप्राप्तांचा गौरव

शासनाच्या योजना घराघरांत पोहोचवा
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून सर्वांना परिचित आहे. शासनातर्फे विविध अभियानातही जिल्हा अग्रस्थानी आहे. जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधी व स्थानिक लोकांच्या सहकार्याने शासनाच्या प्रत्येक योजना घराघरांत पोहोचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री तथा वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हा पोलीस ग्राऊंड येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी केसरकर बोलत होते. आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच पत्रकार उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा दरडोई उत्पन्नात आघाडीवर असलेला जिल्हा आहे. स्वच्छतेतून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण जिल्हा स्वच्छतेकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील एकूण ४३३ ग्रामपंचायतींपैकी ३३८ ग्रामपंचायतींनी निर्मलग्राम पुरस्कार पटकावला असून, उर्वरित ९५ ग्रामपंचायती निर्मलग्राम करून संपूर्ण जिल्हा निर्मलग्राम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेने जास्तीत जास्त प्रभावीपणे काम करावे.
यावेळी जिल्हा आरोग्य विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा परिषद स्वच्छ भारत पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन, पर्यटन महोत्सव २०१५ चे दोन चित्ररथांचे संचलन पार पडले. यावेळी अॅन्झिलीम गर्ल्स प्रमोशन सेंटर, रानबांबुळी, तसेच डॉन बॉस्को हायस्कूल ओरोस यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)