corona virus-दोडामार्गमध्ये रशिया, इंग्लंडमधील पर्यटकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:22 IST2020-03-17T16:20:46+5:302020-03-17T16:22:42+5:30
विदेशाबरोबरच भारतातही कोरोनाची साथ पसरल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गोवा राज्यात पर्यटनासाठी येत असलेल्या विदेशी पर्यटकांकडून गोव्यात साथ पसरल्याचे समोर आले आहे. हे पर्यटक गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत असल्याने त्यांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. रविवारी बारा पर्यटकांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले.

विदेशी पर्यटकांची डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. रामदास रेडकर, डॉ. दिव्या गवस यांनी तपासणी केली.
दोडामार्ग : विदेशाबरोबरच भारतातही कोरोनाची साथ पसरल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गोवा राज्यात पर्यटनासाठी येत असलेल्या विदेशी पर्यटकांकडून गोव्यात साथ पसरल्याचे समोर आले आहे. हे पर्यटक गोव्यातून दोडामार्गच्या दिशेने येत असल्याने त्यांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. रविवारी बारा पर्यटकांची दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले.
विदेशात पसरलेल्या कोरोना व्हायरसने हजारो लोकांचा बळी घेतला. अनेक देशात या व्हायरसचा फैलाव झाला. भारतातही कोरोना सदृश रुग्ण आढळू लागल्याने खळबळ माजली. विदेशी पर्यटकांकडून या व्हायरसचा फैलाव होऊन आपल्या देशातील लोकांना त्याची लागण झाली.
पुणे शहरात विदेशावरून आलेल्या एका पर्यटकाकडून ही साथ पसरल्याचे समोर आले. तर गोवा येथेही चार रुग्ण कोरोनासदृश सापडले. त्यात दोन विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विदेशातून येणाऱ्या पर्यटकांपासून या व्हायरसचा फैलाव होत आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक विदेशी पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
दोडामार्ग तालुका गोव्याला लागूनच असल्याने येथे आलेल्या पर्यटकांची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. रविवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात बारा पर्यटकांची डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. रामदास रेडकर, डॉ. दिव्या गवस यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यात रशियन १० तर इंग्लंडमधील २ पर्यटकांचा समावेश होता. तर शनिवारी भेडशी येथे आलेल्या पाच पर्यटकांचीही तपासणी करण्यात आली होती. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना सोडण्यात आले.
रविवारी दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेले विदेशी पर्यटक गोव्यातून प्रथम विर्डी येथील स्वप्नगंधा या हॉटेलवर गेले होते. मात्र, त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश न देता प्रथम कोरोना व्हायरस तपासणीसाठीसाठी हॉटेल व्यवस्थापक समीर नाईक यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी करून त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांच्या या सतर्कतेबाबत आरोग्य विभागाने कौतुक केले.