पर्यटन प्रकल्प मोजणी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:34 IST2018-01-03T00:27:13+5:302018-01-03T00:34:20+5:30

पर्यटन प्रकल्प मोजणी पुन्हा सुरू
आचरा : केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत तोंडवळी तळाशील किनाºयावर पर्यटन सुविधा उभारण्याच्या प्रकल्पासाठी किनाºयालगतच्या सर्व्हे नं. ७७ मोजणीचे रोखलेले काम ग्रामस्थांच्या संयमी भूमिकेमुळे पुन्हा सुरू झाले आहे. मालवण तहसीलदार यांनी तोंडवळी सरपंच यांना काढलेल्या नोटिसीनंतर मंगळवारी सर्व्हे नंबर ७७ हद्द निश्चितीचे काम हाती घेण्यात आले.
यावेळी तोंडवळी तळाशील ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकारी दीपक माने यांच्याकडे भूमिका मांडताना आपला प्रकल्पास विरोध नसून वहिवाटीच्या जागा वगळून इतर जागेत प्रकल्प राबविण्यास हरकत नसल्याचे सांगितले, तर माने यांनी आपल्या हरकती विचारात घेतल्या जाऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याने प्रकल्पाची मोजणी ग्रामस्थांच्या संयमी भूमिकेमुळे पुन्हा एकदा चालू झाली.
ग्रामस्थांच्या विरोधानंतर मालवण तहसीलदार यांनी तोंडवळी सरपंच यांना नोटीस बजावत २ तारखेला मोजणीच्या कामास पुन्हा सुरुवात केली जाणार असून, सरकारी कामास सहकार्य करण्याचे आवाहन करत मोजणीत अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे कळवले होते.
खास ग्रामसभा बोलाविणार
पर्यटन प्रकल्पाविषयी भूूमिका मांडताना सरपंच आबा कांदळकर व माजी सरपंच संजय केळुसकर म्हणाले की, आम्ही ग्रामस्थ प्रकल्प विरोधी नसून आम्हा ग्रामस्थांच्या वहिवाटीच्या जागा सोडून इतर उरलेल्या जागेत प्रकल्प राबविण्यास आमचा विरोध नाही. परंतु, कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांच्या समुद्रावर जाण्याच्या पायवाटा, होड्यांची ठेवण्याची ठिकाणे तसेच झोपड्यांच्या जागा मात्र प्रकल्पास देणार नाही. तोंडवळी तळाशील भागात असलेल्या अन्य पडीक जमिनीचा वापर या पर्यटनासाठी शासनाने करावा. पर्यटन प्रकल्पाबाबत योग्य तो ग्रामस्थांचा निर्णय घेण्यासाठी खास ग्रामसभा बोलावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.