पालिका बंद करण्याची वेळ

By Admin | Updated: November 10, 2014 23:54 IST2014-11-10T23:19:16+5:302014-11-10T23:54:42+5:30

शिवसेनेची आक्रमक भूमिका : मालवण मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब

The time for closure of the municipality | पालिका बंद करण्याची वेळ

पालिका बंद करण्याची वेळ

मालवण : शहरवासीय धूळ आणि खड्ड्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. राज्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना शहरात डास निर्मूलन मोहिम बंद आहे. कचरा व्यवस्थापन, बंद पथदीप, कमी दाबाचा वीजपुरवठा आदी तक्रारी कायम आहेत. मोकाट गुरांचा त्रास पुन्हा सुरु झाला आहे. पण पालिका प्रशासन पूर्णत: ठप्प आहे. पालिकेकडून नागरिकांना सुविधा मिळत नसतील तर पालिकाच बंद करण्याची वेळ आली आहे, असा इशारा मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.
शहरातील विविध प्रश्नांबाबत सोमवारी शिवसेनेच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना जाब विचारण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, नगरसेवक रविकिरण आपटे, नगरसेविका सेजल परब, शहरप्रमुख नंदू गवंडी, सन्मेश परब, धीरज केळुसकर, जाबीर खान, किसन मांजरेकर, दीपक मयेकर, मेघा गावकर, दीपक गावकर, गणेश कुडाळकर, बाबू मांजरेकर, नंदा सारंग यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख बबन शिंदे म्हणाले, रडतखडत चाललेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांना धुळीच्या समस्येने ग्रासले आहे. सर्वच ठिकाणचे रस्ते खराब झाल्याने नागरिकात असंतोष आहे. पालिका ही समस्या गांभिर्याने घेताना दिसत नाही. नागरिकांना पालिका प्रशासन सुविधा पुरवू शकत नसेल तर घरपट्टी वसुली तरी कशासाठी केली जाते. नागरिकांच्या प्रश्नांबाबत पालिकेने ठोस कार्यवाही हाती घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

समस्यांबाबत पालिका प्रशासन गंभीर
भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर होण्याबाबत ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील काही रस्त्यांखालील पाण्याची पातळी अजूनही कमी न झाल्याने खोदकामात अडचणी येत आहेत. मागील दीड वर्षात भुयारी गटार योजनेच्या कामात गती आली आहे. मागील चार वर्षांपासून शहरातील रस्त्यांवर डांबरीकरण झालेले नाही. यामुळे रस्ते खराब झाले आहेत हे मान्य आहे. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण लवकरात लवकर सुरु करणार आहेत. ४५ किलोमीटरपैकी ३४ किलोमीटर गटार योजनेचे पाईपलाईन पूर्ण झाली आहे. डास निर्मूलनाबाबत व अन्य समस्यांबाबत पालिका प्रशासन गंभीर आहे.
- अरविंद माळी,
मुख्याधिकारी, मालवण
तक्रार रजिस्टर कशासाठी : आपटे
शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनाला समजण्यासाठी व त्यांची तत्काळ सोडवणूक व्हावी यासाठी पालिकेमध्ये तक्रार रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या तक्रार रजिस्टरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाला वेळ नसल्याचे नगरसेवक रविकिरण आपटे यांनी सांगितले. याठिकाणी तत्काळ तक्रार रजिस्टर उपलब्ध करण्यात यावे अशी मागणीही आपटे यांनी केली. पथदीप व मोकाट जनावरांमुळे जनतेच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याचेही ते म्हणाले. खराब रस्ते, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, दिवाबत्ती, डासांचा प्रादुर्भाव, मोकाट जनावरांचा प्रश्न अशा सर्वच बाबतीत मालवण नगरपालिका अपयशी ठरली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रशासन व कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. मात्र पालिका प्रशासनाने ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. आठ दिवसांत पालिकेने कोणतीही कार्यवाही न केल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल असा इशारा भाई गोवेकर यांनी दिला.

Web Title: The time for closure of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.