तिलारीच्या डाव्या कालव्याला भगदाड

By admin | Published: February 5, 2016 12:50 AM2016-02-05T00:50:09+5:302016-02-05T00:50:09+5:30

बोडदेनजीक घडला प्रकार : गोव्याचा पाणीपुरवठा बंद राहणार

Tilari's left canal breaks | तिलारीच्या डाव्या कालव्याला भगदाड

तिलारीच्या डाव्या कालव्याला भगदाड

Next

साटेली, भेडशी : तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गुरुवारी पुन्हा एकदा साटेली-भेडशी बोडदेनजीक भगदाड पडले. ही घटना उघडकीस येताच डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी तत्काळ बंद करून ताबडतोब भगदाड बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे गोव्याचा पाणीपुरवठा अंदाजे दोन दिवस बंद राहणार आहे. कालव्याला भगदाड पडण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी वेळ असल्याने कालव्याच्या निकृष्ट कामाचे नमुने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी गोव्यात सोडले जाते. मात्र, कालव्याच्या कामात झालेल्या गैरव्यवहारामुळे व निकृष्ट पद्धतीच्या कामामुळे कालवे फुटण्याच्या तसेच भगदाडे पडण्याच्या घटना वाढल्या. गेल्या दोन महिन्यांत जवळपास चारवेळा कालव्याला भगदाड पडण्याची घटना घडली. त्यामुळे गोव्यातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. पुन्हा एकदा असाच प्रकार साटेली-भेडशी बोडदेनजीक उघडकीस आला. गुरुवारी डाव्या कालव्याला भगदाड पडून पाणी झिरपत असल्याचा प्रकार निदर्शनास आल्यावर लागलीच कालवा विभागाने कालव्यातून गोव्याला सोडलेले पाणी बंद केले आणि ताबडतोब कालव्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले.
निकृष्ट कामाचे नमुने चव्हाट्यावर
गुरुवारी दिवसभर सिमेंट काँक्रिटने कालव्याला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. काम पूर्ण होईपर्यंत गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यांत खानयाळे ते साटेली भेडशी बोडदे दरम्यान डाव्या कालव्याला भगदाड पडण्याची ही चौथी वेळ आहे.
सिमेंट काँक्रिटने भगदाड बुजविल्यानंतर त्यावर प्लास्टिक कापड टाकून ते घट्ट राहण्यासाठी दगड अथवा वाळू भरलेल्या सिमेंटच्या पिशव्या लावण्याची तकलादू उपाययोजना केली आहे. मात्र, शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे. कालव्याला भगदाड पडण्याच्या या घटनांमुळे प्रकल्पाच्या कालव्याचे निकृष्ट पद्धतीने केलेल्या कामाचे नमुने चव्हाट्यावर आले आहेत.
 

Web Title: Tilari's left canal breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.