‘सह्याद्री’त होणार ‘टायगर डे’
By Admin | Updated: July 28, 2015 21:54 IST2015-07-28T21:54:32+5:302015-07-28T21:54:32+5:30
मंगळवारी कार्यक्रम : वन्यजीव विभागाची तयारी पूर्ण

‘सह्याद्री’त होणार ‘टायगर डे’
पाटण : ‘वर्ल्ड हेरिटेज’ म्हणून गणल्या जाणाऱ्या कोयना व चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. वाघांच्या संवर्धनासाठी कोयना हे ठिकाण अत्यंत अनुकूल असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यातील मेळघाट (ताडोबा), अंधारी (पेंच) प्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास महत्त्व आले असून, येत्या ४ आॅगस्ट रोजी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातही ‘टायगर डे’ होणार आहे. त्याची तयारी सुरू असल्याचा वन्यजीव विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.२९ जुलै हा ‘टायगर डे’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण व मानवी साखळीत वाघांना फार महत्त्व आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातही सध्या पाच पट्टेरी वाघ असल्याचे प्राणी गणनेतून सिद्ध झाले आहे. सुरुवातीला सह्याद्रीची निर्मिती झाली तेव्हा कोयना व चांदोलीत वाघ आहे की नाही, याबाबत बरीच चर्चा झाली होती. आता मात्र गत वर्षीपासून वन्यजीवचे अधिकारी व कर्मचारी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचे ठामपणे सांगत आहेत.वाघांची शिकार करणाऱ्या टोळ्या किंवा स्थानिक तस्कर यांच्यापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून व्याघ्र गणनेच्या आकडेवारीत गुप्तता बाळगली जाते. कोयना व चांदोली अभयारण्याचा १६०० चौरस किलोमीटरचा जंगलव्याप्त भूभाग असून, त्यामध्ये सह्याद्री टायगर प्रोजेक्ट साकारला आहे. व्याघ्र गणनेनुसार पाच पट्टेरी वाघ, तसेच चार किलोमीटर अंतरागणिक बिबट्याचे वास्तव्य सह्याद्री व्याघ्रमध्ये आहे. सुमारे ५० ते ६० बिबटे सह्याद्री व्याघ्रमध्ये असल्याचा वन्यजीव विभागाचा अंदाज आहे. सांबर, भेकर, ससे आदी तृणभक्षी प्राण्यांसहित गवे, रानडुक्कर, अस्वलांची संख्याही लक्षणीय आहे. राज्यातील इतर टायगर प्रोजेक्टच्या तुलनेत सह्याद्री व्याघ्रची प्रसिद्धी झाली पाहिजे, त्यासाठी ‘टायगर डे’ सारखे उपक्रम राबविण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)
मॉरिशिस बेटाएवढा सह्याद्री प्रकल्प
जगात प्रसिद्ध असलेल्या मॉरिशिस बेटाएवढे क्षेत्रफळ कोयना व चांदोली अभयारण्याचे असून, भविष्यात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाची तुलना मॉरिशिस बेटाशी होईल. अत्यंत घनदाट अरण्य व डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या सह्याद्री व्याघ्रला कोयना जलाशयाची किनार लाभली आहे.
२९ जुलै रोजी ‘टायगर डे’ साजरा होणार होता. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निधन झाल्यामुळे ४ आॅगस्टला ‘टायगर डे’ साजरा करण्याचा वन्यजीव विभागाचा, राज्य टायगर प्रकल्पांचा विचार आहे.
-सुभाष पुराणिक, वनसंरक्षक, कोयना वन्यजीव विभाग