एकाच महिन्यात अनुभवले तीन ऋतू
By Admin | Updated: January 7, 2015 00:01 IST2015-01-06T22:17:55+5:302015-01-07T00:01:06+5:30
विचित्र हवामान : हिवाळा, उन्हाळा अन् पावसाळाही आला रत्नागिरीकरांच्या भेटीला

एकाच महिन्यात अनुभवले तीन ऋतू
रत्नागिरी : सध्या वातावरणात दरदिवशी मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. यामुळे रत्नागिरीकर एकाच महिन्यात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतुंचा अनुभव घेत आहेत. जानेवारी कडाक्याच्या थंडीचा महिना असूनही थोडा वेळ उकाडा, मध्येच मळभ आणि पावसाच्या पडणाऱ्या हलक्या सरी असे विचित्र हवामान रत्नागिरीकरांच्या वाट्याला आले आहे. यामुळे सर्दी, खोकला, तापसरी यांसारख्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या प्रमुख तीन ऋतूंचा कालावधी ढोबळमानाने चार महिन्यांचा ठरलेला आहे. मात्र, आता या सर्वच ऋतुंचे ‘टाईमटेबल’ विस्कळीत झालेले आहे. साधारणत: २५ मे ला रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला की, पावसाळ्याची चाहुल लागायची. या नक्षत्राच्या मुहुर्तावर शेतकरी पेरणीची तयारी करायचे आणि ७ जूनपासून पाऊस नियमित व्हायचा. साधारण: सप्टेंबरपर्यंत पावसाळा गृहीत धरला जायचा. त्यानंतर आॅक्टोबर ते जानेवारीपर्यंत हिवाळा. त्यानंतर फेब्रुवारी ते मे या कालावधीत उन्हाळा, असे ऋतूंचे वर्गीकरण आहे. मात्र, आता वातावरणात दिवसेंदिवस बदल होऊ लागला आहे.
यावर्षी जून - जुलैऐवजी आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात नुकसान केले. शेती, मालमत्तेबरोबरच मच्छिमारांचेही प्रचंड नुकसान झाले. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतही तुरळक पाऊस होता. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागात आॅक्टोबरच्या अखेरीस थंडीचे आगमन झाले. मात्र, रत्नागिरीकरांना ‘आॅक्टोबर हीट’ने त्रस्त केले. हा उन्हाळा अगदी डिसेंबरअखेर नागरिकांना सतावत होता.
मात्र, नव्या वर्षाच्या आरंभालाच रत्नागिरीकरांना थंडीचा आनंद मिळू लागला. परंतु हा आनंद काही दिवसच टिकला. तीन दिवस रत्नागिरीकरांना गारठवणाऱ्या थंडीनंतर पुन्हा उष्म्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून मध्येच मळभ आणि वाऱ्यासह पावसाच्या पडणाऱ्या तुरळक सरी या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम जनतेच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र खोकला, घसा बसणे, सर्दी - पडसे, तापसरी यांसारखे आजार बळावू लागले आहेत.
गेले काही दिवस सकाळच्या सत्रात जोरदार वाऱ्याचा त्रास होऊ लागला आहे. या वाऱ्यामुळे मासेमारी करताना अनेक अडचणी येत आहेत. सकाळी थंडी, मध्येच मळभ दाटून येत असल्यामुळे आंब्याचा मोहोर धोक्यात आला आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कोकणातील ऋतुंचे स्वरूप बदलू लागले आहे. त्यामुळे यावर्षी ७ जूनपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने जूनच्या अखेरीस तुरळक प्रमाणात हजेरी लावली. जुलैही कोरडा गेला. मात्र, श्रावणात तुरळक बरसणारा पाऊस यावर्षी जोरदार वाऱ्यासह कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
गतवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस सरासरी १००० मिलिमीटरने कमी झाल्याने काही भागात आताच पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी थंडीचे प्रमाणही कमी आहे, असे जाणकारांकडून बोलले जात आहे.
दिवसेंदिवस वातावरण बदलू लागले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे पावसाची बहुतांश नक्षत्रही यावेळी कोरडीच गेली.
डिसेंबर - जानेवारी या महिन्यात जिल्ह्यात कडाक्याची थंडी असताना सध्या मध्येच उकाडा, अधूनमधून मळभ दाटून येणे, पावसाच्या तुरळक सरी असे बदल होत आहेत. याचा प्रतिकूल परिणाम आंबा, मच्छिमारी आणि जनतेच्या आरोग्यावर होत आहे.
गेले चार पाच दिवस हवामानात बदल झालेला दिसून येत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे मोहोरावर तुडतुड्याचा तसेच शिवाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीमुळे मोहोरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. नरजातीचा मोहोर वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे परागीकरण कमी होऊन फळधारणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तीन वर्षांपूर्वी झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहोर आला होता. मात्र, त्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. अल्प पीक उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. यावर्षीदेखील अधिक थंडीमुळे मोहोराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
- आरीफ शहा,
उपविभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी.
गेले चार पाच दिवस हवामानात बदल झालेला दिसून येत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे मोहोरावर तुडतुड्याचा तसेच शिवाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. शिवाय थंडीमुळे मोहोरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. नरजातीचा मोहोर वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे परागीकरण कमी होऊन फळधारणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तीन वर्षांपूर्वी झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहोर आला होता. मात्र, त्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. अल्प पीक उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. यावर्षीदेखील अधिक थंडीमुळे मोहोराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
- आरीफ शहा,
उपविभागीय कृषी अधिकारी, रत्नागिरी.
आता या सर्वच ऋतुंचे ‘टाईमटेबल’ विस्कळीत.
नव्या वर्षाच्या आरंभालाच रत्नागिरीकरांना थंडीचा आनंद.
तीन दिवस रत्नागिरीकरांना गारठवणाऱ्या थंडीनंतर पुन्हा उष्म्याचा त्रास.
मळभ आणि वाऱ्यासह पावसाच्या पडणाऱ्या तुरळक सरी या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम.
सर्वत्र खोकला, घसा बसणे, सर्दी - पडसे, तापसरी यांसारखे आजार बळावले.
दोन दिवसांपासून सकाळी जोरदार वाऱ्याचा त्रास.
मच्छिमार अनेक अडचणींच्या फेऱ्यात.