तिघांचे नामनिर्देशन दाखल

By Admin | Updated: July 12, 2014 00:22 IST2014-07-12T00:16:25+5:302014-07-12T00:22:57+5:30

मालवण नगराध्यक्ष निवडणूक : तिघांचेही अर्ज वैध

Three nominations filed | तिघांचे नामनिर्देशन दाखल

तिघांचे नामनिर्देशन दाखल

मालवण : मालवण नगरपरिषदेच्या १७ रोजी होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी काँग्रेसकडून नगरसेवक अशोक तोडणकर आणि दीपक पाटकर या दोघांनी तर शहर विकास आघाडीच्यावतीने नगरसेवक महेश जावकर यांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. अर्ज छाननीत तिघांचेही अर्ज वैध ठरले. १६ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जून ते नोव्हेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका न घेण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र शासनाच्या या आदेशाला मंत्रीमंडळानेच आक्षेप घेत हा निर्णय रद्दबातल ठरविला होता. त्यामुळे या निवडणुका घेण्याचे फेरआदेश देण्यात आले आहेत. मालवण नगरपालिकेतील नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या अडीच वर्षांचा कालावधी संपत आल्याने १७ रोजी नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून नगरसेवक अशोक तोडणकर व दीपक पाटकर यांनी अर्ज दाखल केला.
अशोक तोडणकर यांच्या अर्जाला सूचक म्हणून नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व अनुमोदक म्हणून नगरसेविका संतोषी कांदळकर यांनी सह्या केल्या. नगरसेवक दीपक पाटकर यांना सूचक म्हणून नगरसेवक मंदार केणी व अनुमोदक म्हणून ममता वराडकर यांनी सह्या केल्या. मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगरसेवक जॉन नऱ्होना, मंदार केणी, दीपक पाटकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, संतोष कांदळकर, हेमंत तोडणकर, स्रेहा आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष सुहास हडकर आदी उपस्थित होते.
शहर विकास आघाडीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी नगराध्यक्ष निवडीसाठी नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी आघाडीचे गटनेते रविकिरण आपटे, नगरसेवक नितीन वाळके, नगरसेविका पूजा करलकर, दर्शना कासवकर, शिला गिरकर, रेजिना डिसोजा, सेजल परब, मनोज मोंडकर, आगोसिन डिसोजा आदी उपस्थित होते. अर्ज दाखल करून घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी तीनही अर्जाची छाननी केली. यानंतर तीनही अर्ज वैध असल्याचे त्यांनी जाहीर
केले. (प्रतिनिधी)

Web Title: Three nominations filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.