दाभोळ किनारी हजारो मृत मासे
By Admin | Updated: July 28, 2015 00:29 IST2015-07-27T23:57:32+5:302015-07-28T00:29:44+5:30
प्रदूषणाचा कहर : विविध जातीचे मासे मेल्याने मच्छीमार संकटात

दाभोळ किनारी हजारो मृत मासे
'दापोली : लोटे औद्योगिक वसाहतीचे रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत वारंवार सोडण्यात येते. त्यामुळे दाभोळ खाडीतील लाखो मासे दरवर्षी मृत्यू पावत असून, रविवारी सायंकाळीही या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच आढळून आला. दरवर्षी पावसाळ्यात लोटे एमआयडीसीचे रसायनमिश्रीत दूषित पाणी सोडण्यात येऊ लागल्याने दाभोळ खाडीतील मच्छी व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर्षी एकाच महिन्यात दोनदा मृत मासे किनाऱ्यावर आढळण्याचा प्रकार घडला आहे.
दाभोळ खाडीवर पारंपरिक उपजीविका करणारा मच्छीमारी व्यवसाय संकटात सापडला असून, दाभोळ खाडीवर सुमारे ४० ते ५० गावातील मच्छीमार बांधव उपजीविका करतात. दाभोळ खाडीवर मासेमारी करुन पारंपरिक पद्धतीने अनेक पिढ्या हा समाज जीवन जगत होता. रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून लोटे येथील माळावर औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली. परंतु या व्यवसायामुळे दाभोळ खाडीला शाप लागला आहे. रविवारीही अशाच प्रकारे दाभोळ किनारी हजारो मासे मृतावस्थेत आढळले. त्यामध्ये मोठ्या माशांचाही समावेश होता.
कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर गेल्या १५ दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विविध जातीच्या माशांचा खच पडला होता. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्गंधी पसरली होती. १५ दिवसांनी पुन्हा मच्छीचा खच समुद्रकिनाऱ्यावर लागल्याने स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
माशांच्या प्रजनन कालावधीतच रसायनमिश्रीत दूषित पाणी सोडून लाखो मासे मारण्यात येत आहेत. परंतु प्रदूषण नियामक मंडळ करतेय काय, असा सवाल उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. मासे मृत पावल्यानंतर प्रदूषण नियामक मंडळाचे लोक येतात. नमुने घेऊन जातात. गेली कित्येक वर्षे हे असेच सुरु आहे. परंतु हे मासे कशामुळे मरतात, याचा पत्ता अजूनही लागलेला नाही.
- माधव महाजन, ग्रामस्थ.