चिपळूण तालुक्यातील मतिमंदांच्या निकोप वाढीसाठी आशेची जिद्द

By Admin | Updated: August 8, 2014 00:42 IST2014-08-07T21:34:29+5:302014-08-08T00:42:25+5:30

सामाजिक चळवळ : २६ वर्षांच्या अथक मेहेनतीनंतर रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर

Thought of hope for the development of the mindset of Chiplun taluka | चिपळूण तालुक्यातील मतिमंदांच्या निकोप वाढीसाठी आशेची जिद्द

चिपळूण तालुक्यातील मतिमंदांच्या निकोप वाढीसाठी आशेची जिद्द

राजेश कांबळे = अडरे चिपळूण तालुक्यातील बौद्धिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय घेऊन सुमती जांभेकर यांनी प्रा. इंदुमती पोळ यांच्या सहकार्याने २६ जानेवारी १९८८ रोजी जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेची स्थापना केली. केवळ दोन विद्यार्थ्यांपासून सुरु करण्यात आलेल्या शाळेत आता ९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
२४ वर्षांच्या कालावधीत जिद्दचे मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांनी सातत्याने नवीन विचार प्रवाहांशी जुळवून घेत शाळेत अंतर्बाह्य विकास घडवला आहे. येथे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी समाजातील अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रगती करत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जिद्द सातत्याने नवनवीन शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक उपक्रम राबवत आहे. क्रीडा विभागात सुनील शिंदे, तर सांस्कृतिक विभागात उमेश कुचेकर यांनी खेळ व कला प्रकारात शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत उंचावले आहे. जिद्द ही शासनमान्य अनुदानित शाळा असली तरी ४० विद्यार्थी संख्येला अनुदान मिळते. सध्या शाळेत ९५ विद्यार्थी आहेत. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, संस्था आर्थिक व वस्तुस्वरुप सहाय्य करुन आमचा भार हलका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षण घेतलेल्या १८ वर्षे पूर्ण झालेल्यांचे आर्थिक पुनर्वसन करणे, प्रशिक्षण देणे व समाजातील उत्पादनशील घटक बनवणे, हा या संस्थेचा हेतू आहे. १९९५ साली जिद्द उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली. उद्योग केंद्रात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. या जोरावर जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेतील १६ विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील काही विद्यार्थी कंपनीत, टेलरिंंगच्या दुकानात व क्लिनर म्हणून काम करीत आहेत. विद्यार्थ्यांची आवड, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना आकाशकंदील बनविणे, भेटकार्ड, उटणे, लिक्वीड सोप, फिनेल, नागपंचमीसाठी नाग, राख्या तयार करणे, लोकरीचे रुमाल बनवण्याचे प्रशिक्षण देऊन उत्पादन करण्यास शिकवले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक आणि मानसिक विकास व्हावा, यासाठी झटत आहेत.

येथे येणाऱ्या मुलांना स्वत:विषयी अभिमान वाटावा, यासाठी ८ वर्षांपासून जिद्द शाळेत दर महिन्याला विद्यार्थ्यांचे वाढदिवस एकत्ररित्या साजरे केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान निर्माण व्हावा, उत्पादन वाढावे, यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर संस्थेने हा उपक्रम सुरु केला आहे.
- सुमती जांभेकर
सेक्रेटरी कोवॅस, चिपळूण

Web Title: Thought of hope for the development of the mindset of Chiplun taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.