‘त्या’ नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार?

By Admin | Updated: November 22, 2014 00:15 IST2014-11-21T22:51:12+5:302014-11-22T00:15:40+5:30

राजकीय समीकरणे बदलणार?

'Those' corporators on the charge of disqualification? | ‘त्या’ नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार?

‘त्या’ नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार?


रत्नागिरी : रत्नागिरी पालिका उपनगराध्यक्षपदाच्या ११ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून फुटून वेगळा गट केल्याचे सांगणाऱ्या चार नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन करून शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले. त्यांचे हे वर्तन बेकायदा असून, या चारही सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी याचिका राष्ट्रवादीचे नगरपालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी आज (शुक्रवार) जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. ही याचिका उपजिल्हाधिकारी नितीन राऊत (पुनर्वसन) यांनी स्वीकारली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठविली आहे. त्यामुळे या चारही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
ज्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, त्यामध्ये दत्तात्रय विजय साळवी, प्रीती रवींद्र सुर्वे, स्मितल सुरेश पावसकर व मुनीज तन्वीर जमादार यांचा समावेश आहे. रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष असलेले राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी सेनेतर्फे संजू साळवी, तर भाजपातर्फे प्रज्ञा भिडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यासाठी ११ नोव्हेंबर २०१४ रोजी निवडणूक झाली. त्याआधी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या आदेशानुसार रत्नागिरी पालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना ६ नोव्हेंबर २०१४ रोजी उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपा उमेदवाराला मतदान करण्याचा पक्षादेश दिला होता.
मात्र, एकूण सहापैकी ४ नगरसेवकांनी आपला वेगळा गट करीत ११ नोव्हेंबरच्या उपाध्यक्ष निवडणुकीत सेनेच्या संजू साळवी यांना मतदान करून पक्षादेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ व ५ व त्याखालील नियमानुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हा याचिका अर्ज मयेकर यांनी त्यांचे वकील भाऊ शेट्ये तसेच राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे दाखल केला आहे. (प्रतिनिधी)


राजकीय समीकरणे बदलणार?
नगरपालिकेत सध्या सेनेचे १३ व राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट केलेले ४ असे सेनेसोबतचे एकूण १७ सदस्य आहेत. तर भाजपाचे ८, राष्ट्रवादीचे २ व कॉँग्रेसचा एक असे ११ सदस्य भाजपकडे आहेत. भाजपाचे नगराध्यक्ष पालिकेत विराजमान आहेत. या स्थितीत चार सदस्यांचा वेगळा गट अपात्र ठरला तर चार जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ १३ होईल. त्याचबरोबर सेनेतील २ नगरसेवक राजीनामा देण्याची शक्यताही आहे. असे राजकीय समीकरण जुळले तर सेना व भाजपा पालिकेत प्रत्येकी ११ या संख्याबळावर येऊ शकते. मात्र, प्रत्यक्षात निर्णय काय होतो, काय घडते यावरच पुढील समीकरणे अवलंबून आहेत.

Web Title: 'Those' corporators on the charge of disqualification?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.