तिसऱ्या दिवशीच्या सादरीकरणाने रंगत वाढली
By Admin | Updated: January 29, 2015 00:11 IST2015-01-28T22:16:10+5:302015-01-29T00:11:09+5:30
नाथ पै एकांकिका स्पर्धा परीक्षण

तिसऱ्या दिवशीच्या सादरीकरणाने रंगत वाढली
युरेका सायन्स क्लब कणकवलीच्या हौशी कलाकारांच्या बिनधास्त अभिनयाने गतिशील बनलेला ‘आली रे आली दहावी आली’ हा प्रयोग तसेच शिरगाव हायस्कूल शिरगावच्या कलाकारांनी प्रयोगशील एकांकिकेमध्ये दाखविलेली चमक यामुळे नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही स्पर्धेची रंगत कायम राहिली.आली रे आली दहावी आली
युरेका सायन्स क्लब कणकवलीच्या उत्साही बालकलाकारांनी सुषमा केणी लिखित व श्रीधर पाचंगे दिग्दर्शित ‘आली रे आलीदहावी आली’ एकांकिका जोशात सादर केली.या एकांकिकेत रंगमंचावर सुरुवातीला बागेत मुलं खेळताना बागडताना दिसतात. ती खूष आहेत. क्रिकेट तर त्यांचा आवडता खेळ. धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा त्यांच्या गळ्यातील ताईत. अधिकारवाणीनं क्रिकेटवर आपली मतं मांडताहेत. त्याचवेळी त्यांचा नववीचा निकाल लागला आहे. मुलं आपापल्या गुणांची टक्केवारी सांगत आहेत. त्याचबरोबर मिळालेल्या गुणांबद्दल आईवडीलांची काय प्रतिक्रिया आहे तेही आवर्जून सांगताहेत. मुलं मोकळेपणाने बोलताहेत. त्यांची तक्रार आहे आपल्या आईवडीलांबद्दल. पालक-नातेवाईकांबद्दल. जी अगदी रास्तही आहे. त्यांचं म्हणणं चुकीचं नाही. परीक्षेचं महत्त्व त्यांनाही मान्य आहे. पण परीक्षेच्या नावाखाली त्याचं बालपण, त्याचं खेळणं-बागडणं मित्रांशी संवाद साधणं, आजी-आजोबा बरोबर मौज मस्ती करणं जे त्यांना आवडतं आणि हे बंद करू पाहणारे त्यांचे हितचिंतक त्यांना शत्रू वाटू लागतात.मुलांनी काय शिकावं काय शिकू नये हे आईवडील, पालकच ठरवतात. आई-वडील दोघेही डॉक्टर असतील तर त्यांना आपल्या मुलांनीही डॉक्टर व्हावे असे वाटते. पालक हे कधीही गृहित धरत नाहीत की त्यांच्या मुलांची आवड-निवड काही वेगळीही असू शकते. मानसशास्त्र तर सांगतं की मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकायला, काम करायला आवडते. ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात. कामाचं कोणतंही क्षेत्र श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतंच मुळी. बहुतांशी पालक मुलांचं भावविश्व समजून घेत नाहीत आणि मुलांवर स्वत:च्या आशा आकांक्षाचं ओझं लादतात. त्यातून निर्माण होणारे प्रश्न लेखिकेनं एकांकिकेत छान हाताळलेत. खरं तर आपली आवड काय आहे. आपण कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो हे मुलांनाही कळतं. तेव्हा पालकांची जबाबदारी त्यांच्या मार्गदर्शकाची असावी असा संदेश एकांकिका देते. राखी अरदकर यांचे नेपथ्य, किशोर कदमांची प्रकाशयोजना, नेत्रा पाचंगेचे संगीत वातावरण निर्मितीस पोषक आणि परिणामकारक आहे.
कुलूपशिरगाव हायस्कूल शिरगावच्या विद्यार्थ्यांनी डॉ. राजेंद्र चव्हाण लिखित व दिग्दर्शित ‘कुलूप’ एकांकिका सादर केली.
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये सृजनशील लेखन करणाऱ्या कोणत्याही लेखकाला आजही नवं काही लिहायला तसेच या कथांचा नवा अन्वयार्थ लावायला प्रेरीत करतात. आधुनिक भारतीय आर्य आणि अनार्य भाषेत रामकथेचा नवा अन्वयार्थ लावणारे खूप लेखन झाले आहे. डॉ. राजेंद्र चव्हाणांनी रामकथेचा आधार घेत त्यांच्या बुद्धीला तर्कसंगत वाटणारी व आजच्या संदर्भात त्यातून काही संदेश देणारी नवी मांडणी ‘कुलूप’ एकांकिकेत केली आहे.एकांकिकेतील राम, सीता व लक्ष्मण रावणाबरोबरच्या युद्धात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेल्या हनुमानाचे तोंड भरून कौतुक करतात. रामभक्त हनुमान प्रभूराम व सीतामातेच्या या कृतीनं संकोचतो. सीता हनुमानाला आपल्या गळ्यातील हार देऊ करते. हनुमान नम्रपणे भेटवस्तू नाकारतो. पण प्रभूरामाच्या व सीतेच्या आग्रहामुळे हार हनुमान स्वीकारतो. पुढे काहीसा अज्ञातवासात गेलेला हनुमान सीतामातेनं दिलेला हार तोडताना फोडताना दिसतो. हे दृश्य पाहून राम-सीता गोंधळून जातात. लक्ष्मणाचा क्रोध अनावर होतो. राम लक्ष्मणाला समजावतो. हनुमान हारामध्ये आपल्या प्रिय रामाला शोधत असल्याचे सांगतो. आपली छाती फाडून प्रभू रामाचे दर्शन करणारा हनुमान दाखवता ती मांडणी लेखकाने वेगळ्या पद्धतीनं एकांकिकेत केली आहे.एकांकिकेत लेखकाने जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, माकडांच्या जगण्या-मरण्याचा निर्माण झालेला प्रश्न मांडला आहे. बेसुमार जंगलतोड होत आहे. जंगलातील लाकडे तोडून घरे बांधली जात आहेत. जंगलतोड करून लाकडांची विक्री करून घरातील गृहिणीसाठी दागिने खरेदी केले जात आहेत आणि घरातील संपत्ती सुरक्षित रहावी म्हणून घराला भलं मोठं कुलूप लावलं जात आहे. जंगलतोडीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्येकडे कोणी फारसं गंभीरपणे पहात नाही ही चिंतेची गोष्ट आहे आणि नेमकी तीच लेखकाला एकांकिकेच्या माध्यमातून सांगायची आहे. म्हणून एकांकिकेचं नाव कुलूप.एकांकिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांचा संयत व कसदार अभिनय प्रेक्षकांची मने जिंकणारा होता. माकडांच्या विशिष्ट प्रकारच्या हालचाली विलक्षण ताकदीनं बालकलाकारांनी साकारल्या. पार्श्वसंगीत व गायन वातावरण निर्मितीस पोषक व परिणामकारक होते.
प्रा. डॉ. लालासाहेब घोरपडे