माळीणसारखे संकट कळणेवरही येईल
By Admin | Updated: August 3, 2014 22:47 IST2014-08-03T22:03:48+5:302014-08-03T22:47:11+5:30
उपरकर : मायनिंगवाल्यांना केसरकरांचा वरदहस्त

माळीणसारखे संकट कळणेवरही येईल
कसई दोडामार्ग : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगरकडा कोसळल्याने संपूर्ण गाव गाडले जाऊन मनुष्यहानीही झाली. कळणे गावातही मायनिंग प्रकल्प सुरू असून डोंगर पोखरले जात आहेत. हे डोंगर कधीही कोसळून माळीण गावाप्रमाणेच दुर्घटना घडू शकते, असे मत मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे. तसेच मायनिंगवाल्यांवर आमदार दीपक केसरकरांचा वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळणे मायनिंगसारखे विनाशकारी मायनिंग प्रकल्प असेच सुरू राहिल्यास दोडामार्ग तालुक्यातील मायनिंगग्रस्त गावांवर माळीण गावाप्रमाणेच दुर्दैैवी परिस्थिती ओढवू शकते. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्पांसाठी वृक्षांची तोड केली जात आहे. डोंगरच्या डोंगर नाहीसे केले जात आहेत. मायनिंगमधून मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापोटी वृक्षतोड केली, तर उघड्याबोडक्या जमिनीची प्रचंड धूप होते आणि दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अगोदरच मायनिंगसाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केल्याने जमिनीची धूप झालेली आहे. त्यात करून याच प्रकारचे आणखी ५० विनाशकारी प्रकल्प या दोन्ही तालुक्यात प्रस्तावित आहेत. मायनिंग माफिया स्वत:च्या आर्थिक लाभासाठी पर्यावरणाचा विध्वंस करत असून या सर्व माफियांवर आमदार दीपक केसरकर यांचा वरदहस्त आहे.
त्यामुळे उद्या माळीण गावासारखी परिस्थिती उद्भवली आणि मायनिंगच्या हव्यासापायी दोडामार्ग तालुक्यातील एखादे गाव दरड कोसळून गाडले गेले, तर त्याला सर्वस्वी जबाबदार आमदार केसरकरच असतील. माधव गाडगीळ यांना आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मायनिंग होण्याची आपली इच्छा आहे, असे आमदार केसरकर यांनी लिहिलेले गुप्त पत्र गाडगीळांनी इंटरनेटवर उघड केल्याने केसरकरांचा खरा चेहरा समोर आला आहे. जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर स्वत:च्या स्वार्थासाठी मतदारसंघातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या केसरकरांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता कधीही माफ करणार नाही, असे म्हटले आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात मुरुड-जंजिरा, डहाणू तालुका, माथेरान व महाबळेश्वर पाचगणी हे चार टापू इको-सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर झालेले आहेत. परंतु तिकडचे लोक झोपड्यांमध्ये राहतात का, बैलगाड्यांतून फिरतात का? याची खातरजमा करण्यासाठी पुढील पंधरावड्यात सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जी गावे इकोसेन्सिटिव्ह जाहीर झाली आहेत, त्या गावातील प्रत्येकी ४ प्रतिनिधींना मनसेतर्फे महाबळेश्वर येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचा पर्दाफाश होईल, अशी माहिती देत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपरकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)