काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे

By Admin | Updated: October 23, 2014 22:52 IST2014-10-23T20:47:49+5:302014-10-23T22:52:56+5:30

काँग्रेसपासून राष्ट्रवादी अलग झाल्यानंतर काँग्रेसच्या यशाला उतरती कळा लागली

There was a big challenge before the Congress office bearers | काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे

काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे

रत्नागिरी : लोकसभेच्या निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते खचून गेले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे आणि त्यातही पाच पैकी चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या बांधणीपासून पक्षाच्या उभारणीपर्यंत साऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी होती. ज्याच्या निवडणूक चिन्हावर उमेदवारी लढवली गेली त्याच्याच माथी अपयशाचे खापर फोडण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी तुटली व प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढला. त्यामुळे काँग्रेसची खरी ताकद आता जनतेसमोर आली आहे. काँग्रेसपासून राष्ट्रवादी अलग झाल्यानंतर काँग्रेसच्या यशाला उतरती कळा लागली आहे. नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर थोड्या फार प्रमाणात पक्ष सावरला होता. मात्र, त्यानंतर आता राणेंची ताकद कमी झाल्याने काँग्रेसवर पुन्हा एकदा नामुष्कीजनक पराभव पत्करण्याची वेळ आली आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कीर (रत्नागिरी), जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी कदम (चिपळूण), तालुकाध्यक्ष संदीप सावंत (गुहागर), अ‍ॅड. सुजित झिमण (दापोली), राजन देसाई (राजापूर) यांनी काँग्रेसकडून निवडणूक
लढवली.
राजापूर मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष रमेश कीर हे इच्छुक होते. मात्र, त्यांचे त्या ठिकाणचे तिकीट कापून त्यांना रत्नागिरी येथे तिकीट देण्यात आले. स्थानिक नेते राजन देसाई यांना राजापूरची जागा देण्यात आली.
राजापुरात देसाई यांनी आपली अनामत रक्कम वाचवलीच मात्र दुसऱ्या क्रमांकाची मतेही मिळवली. मात्र, उर्वरित उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. जिल्हाध्यक्ष कीर हे निवडणूक रिंगणात असल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शेखर कातकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, कातकर यांनीही म्हणावे तेवढे प्रचारामध्ये लक्ष घातले नसल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कीर यांना भंडारी समाज संघाने पाठिंबा दिला होता. तरीही कीर यांना केवळ ५ हजार ४६ मते मिळाली. काँग्रेसचा दारुण पराभव होत असताना दुसरीकडे काँग्रेसला गटबाजीने ग्रासले आहे. गटबाजीला कंटाळून व वारंवार येणाऱ्या अपयशाने हैराण होऊन अनेक जुने व एकनिष्ठ पदाधिकारी काँग्रेस सोडून गेले. काहीजण काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, निवडणूक प्रचाराच्या वेळी ते अलिप्त राहिले.
आता विधानसभा निवडणूक संपल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या पुनर्बांधणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. नाहीतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसची स्थिती आणखी नाजूक होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल, असे पक्षातूनच म्हटले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There was a big challenge before the Congress office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.