पालकमंत्र्यांच्या भेटीचे निमंत्रणच नाही
By Admin | Updated: January 19, 2016 23:37 IST2016-01-19T21:21:34+5:302016-01-19T23:37:14+5:30
दोडामार्ग नगरपंचायत : संतोष नानचे यांची माहिती

पालकमंत्र्यांच्या भेटीचे निमंत्रणच नाही
कसई दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या नगरपंचायत भेटीची प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची रीतसर माहिती देण्यात न आल्यामुळे मी, उपनगराध्यक्ष तसेच काँग्रेस आघाडीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिलो, असा खुलासा दोडामार्ग नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केला आहे.सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हे दोडामार्ग शहरात आले व त्यांनी नगरपंचायतीला भेट दिली. वास्तविक पाहता राज्य, जिल्हास्तरावरील एखादी महनीय व्यक्ती नगरपंचायत किंवा संबंधित ठिकाणी येत असल्याची पूर्वकल्पना तेथील स्थानिक प्रशासनाला असते व प्रशासनाने ती संबंधितांना कळविणे आवश्यक असते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या दोडामार्ग नगरपंचायतीच्या भेटी संदर्भातील कोणतीही रीतसर माहिती न मिळाल्यामुळेच आम्ही तिथे उपस्थित राहू शकलो नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीवेळी आम्ही मुद्दाम अनुपस्थित राहिलो, असा अर्थ काढून काहीजणांनी स्वत:ची करमणूक करून घेतल्याचे नानचे यांनी सांगितले. (वार्ताहर)
मुख्याधिकारी तसेच अधिकारी, कर्मचारी मिळावेत
नगरपंचायतीच्या विकासात्मक कार्यवाहीच्यादृष्टीने आवश्यक मुख्याधिकारी व आकृतिबंधाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी, वगैरेंच्या नियुक्त्या होण्यासंदर्भात राज्यस्तरावरील संबंधित मंत्री, अधिकारी, प्रशासन यांना एका निवेदनाद्वारे कळविण्यात आल्याचीही माहिती नानचे यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती नानचे यांनी दिली.