राजेश कांबळे - अडरे -चिपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या ग्रामीण भागातील परिसरात सप्टेंबरअखेर अनेकांना विंचूदंश, सर्पदंश व श्वानदंश झाल्याची नोंद आहे. यामध्ये ३३२ जणांना विंचूदंश, २७५ जणांना श्वानदंश, सर्पदंश ७३ झाला आहे. यातील एकही रुग्ण दगावलेला नाही, अशी माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.चिपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत या परिसरातील ग्रामीण भागात विंचू, श्वान व सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पायवाटांना धुरळा पडतो. शिवाय वातावरणात उष्णता अधिक असल्याने विंचूदंशाचे प्रमाण वाढते. कौलारु घरांचाही विंचू आधार घेतात. तर उष्ण हवामान असल्याने सरपटणारे प्राणी फारसे रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण कमी होते. सध्या मोकाट व भटक्या श्वानांचे प्रमाण वाढले आहे. श्वानांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने किंवा ते मारले जात नसल्याने भटक्या श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. कोकणातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विंचूदंश होण्याच्या घटना घडत असतात. वातावरणात बदल किंवा शेतीपूर्व मशागत, लावणीच्या कामाच्या वेळी, इतर कामानिमित्त शेतकरी व इतरांना विंचूदंश होतो. तसेच ग्रामीण भागात जंगलाचे प्रमाणही जास्त असल्याने शेतकरी सकाळी पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत काम करत असतात. यावेळी अचानक दंश होण्याच्या घटना घडत असतात. श्वान, सर्प व विंचूदंश झालेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दाखल करुन त्यांच्यावर औषधोपचार व इंजेक्शन देवून त्या रूग्णांना बरे केले जाते. यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या मंजुरीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत स्नेकबाईट व विंचूदंशाची इंजेक्शन उपलब्ध केली जातात. त्यामुळे विंचू किंवा सर्पदंश झाल्याने दगावण्याचे प्रमाण ० टक्के आहे. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात विंचूदंशाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाल्याने आता विंचूदंश झाल्यानंतर त्याला प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी याच हंगामात विंचू दंशावरील लस उपलब्ध नसल्याचे समोर येत असताना ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. चपळूण तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आकडेवारीनुसार विंचूदंशाच्या प्रमाणात वाढ.उन्हाळ्यात वाढते सर्पदंशाचे प्रमाण. एकही रूग्ण दगावला नसल्याचे स्पष्ट. उपाययोजना आवश्यक असल्याचे स्पष्ट.
चिपळुणात विंचूदंशाचे प्रमाण वाढले
By admin | Updated: October 29, 2014 00:09 IST