ओरोस : महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्हा परिषदांसाठीजिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने शुक्रवारी जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी असणार आहे.
दि. २१ मार्च २०२२ पासून आतापर्यंत म्हणजेच साडेतीन वर्षे या जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. मात्र आता ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच या आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यात इच्छुकांची संख्या वाढणार असून, काहींनी मोर्चे बांधणीला सुरुवातदेखील केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ३३ व्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदाच्या निवडणुका कधी जाहीर होणार? याची उत्सुकता लागली होती. तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या. आरक्षण मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या संपूर्ण प्रक्रियेला वेग आला होता. ग्रामविकास विभागाने आरक्षणाबाबत जाहीर केले. आरक्षण काढताना २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत सुरू आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा, प्रभागरचनेचा मुद्दा, राज्यातील सत्तांतर त्यानंतरची बदललेली राजकीय स्थिती त्यामुळं राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा कोर्टात प्रलंबीत होता. अखेर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पद सर्वसाधारणसाठी असणार आहे. आरक्षण जाहीर झाल्याने आगामी दोन ते तीन महिन्यात राज्यात निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.साडे तीन वर्षे प्रशासकसिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्यांची मुदत २१ मार्च २०२२ रोजी संपल्याने या जिल्हा परिषदेवर शासनाने प्रशासक नियुक्त केला होता. काही महिन्यांनी निवडून लागेल अशी अशा होती मात्र आता साडेतीन वर्षे या जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे.
खरी लढत भाजप विरुद्ध शिंदेसेनेत
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहावी यासाठी जिल्ह्यातील पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करणार आहेत. मात्र जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहता खरी लढत ही भाजपा आणि शिंदेसेना या पक्षातच असल्याचे दिसून येत आहे.मागील पक्षीय बलाबलनारायण राणे भाजपमध्ये आल्यावर काँग्रेस पक्षाच्या २७ सदस्यांपैकी २४ सदस्यांनी राणेंसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राणे समर्थक २४ अधिक मूळ भाजपा सदस्य ६ अशी एकूण ३० सदस्य संख्या झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजप संख्या ३१ झाली होती. शिवसेना १६ आणि काँग्रेस कडे ३ सदस्य होते.
नियमित २५ वा अध्यक्ष मिळणार
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आतापर्यंत ३२ अध्यक्ष विराजमान झाले आहेत. यात २४ नियमित तर ८ प्रभारी अध्यक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणुकीतून जिल्हा परिषदेला नियमित २५ वा अध्यक्ष मिळणार आहे.