Sindhudurg: सावंतवाडीची हद्द वाढतेय; नव्याने सुविधा निर्माण करण्याची गरज
By अनंत खं.जाधव | Updated: May 17, 2025 16:30 IST2025-05-17T16:29:52+5:302025-05-17T16:30:11+5:30
अनंत जाधव सावंतवाडी : मागील काही वर्षांत सावंतवाडी शहराचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच घरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात ...

Sindhudurg: सावंतवाडीची हद्द वाढतेय; नव्याने सुविधा निर्माण करण्याची गरज
अनंत जाधव
सावंतवाडी : मागील काही वर्षांत सावंतवाडी शहराचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. लोकसंख्या वाढीबरोबरच घरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहराच्या चारही बाजूला नवनवी नगरे, वसाहती, अपार्टमेंट तयार होत आहेत. खुल्या जागेबरोबरच तयार असलेल्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्यांनी वाढल्या आहेत.
शहर वस्ती वाढली तिथे घरांच्या किमती वाढलेल्या भागातही नगरपरिषद सेवासुविधा देत असून त्या सेवासुविधा पुरेशा म्हणता येत नाही. नगरपरिषदेवर बंधने येत आहेत. वाढलेल्या भागात पाण्याची व्यवस्था करण्यास नगरपरिषदेला हवे तसे यश येत नाही. शिवाय रस्ते, दिवाबत्तीची सोयही होत नाही. परिणामी नव्याने वसलेल्या वसाहतीतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांची दमछाक होत आहे.
सावंतवाडीची हद्द वाढतेय
सावंतवाडी शहरातील चराठे, कोलगाव, माजगाव आदी ठिकाणी घरे, निवासी संकुलांची संख्या वाढत आहे. सध्या खुल्या जागेचे व घरांचे दरही महागले आहेत. मात्र, या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवासुविधा मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
ना रस्ते, ना नाले, ना वीज
सावंतवाडी शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. अनेक नव्याने संकुलं उभी राहत आहेत. या ठिकाणचे लोक वेळेवर नगरपरिषदेचा कर भरतात, मात्र नगरपरिषदेची यंत्रणा हव्या त्या सुविधा वेळेवर देत नाही.
विकासाबाबत कोणताही दृष्टिकोन नाही..
- नव्याने ले-आउटमध्ये आजही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.
- नगरपरिषदेची स्वतंत्र यंत्रणा असताना, विकासाबाबत कोणताही दृष्टिकोन ठेवण्यात आला नसल्याचे सावंतवाडीतील जाणकार लोक सांगतात.
- शहराचा विस्तार वाढत असला, तरी सेवासुविधा हव्या तशा मिळत नाहीत.
सावंतवाडी शहराची हद्द नव्याने वाढत आहे. आता नगरपरिषदेने वेगळे नियोजन करून यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. नव्याने घरे सामील झाली तर त्यांना सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. - आनंद नेवगी, माजी नगरसेवक