पावसाच्या तोंडावर मसल्याचा तडका
By Admin | Updated: June 3, 2015 01:25 IST2015-06-03T01:22:43+5:302015-06-03T01:25:33+5:30
महिलांची लगबग सुरू : वर्षभराच्या बेगमीची जोरदार तयारी; गावठी व घाटी मिरचीचे तिखट करण्याचा धरला जोर

पावसाच्या तोंडावर मसल्याचा तडका
बाळकृ ष्ण सातार्डेकर - रेडी -जिल्हाभरात विशेषत: ग्रामीण भागामध्ये पावसाळ््यात गरम मसाल्याची बेगमी म्हणून गावठी आणि घाटी मिरची कुटून उत्कृष्ट, तिखट व रुचकर मसाले तयार करण्याच्या कामाने सध्या जोर धरला आहे. जेवणासाठी वर्षभरासाठी लागणारा चवदार मसाला बनविण्यासाठी रेडी पंचक्रोशीसह भागातील गृहिणींची धावपळ चालली आहे; परंतु मसाल्यामध्ये रुची निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थांची आवक कमी झाल्याने या पदार्थांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींना मसाला सामानाची जमवाजमव करताना कसरत करावी लागत आहे.
सध्या मे महिन्याच्या सुटीत चाकरमानी वर्ग गावात दाखल झाल्यानंतर गावठी मिरचीचा गरम व हिरवा मसाला येथे उत्कृष्ट बनवून मुंबई येथे आपल्या दररोजच्या आहारात वापरण्यासाठी नेत आहेत. ग्रामीण भागात विशेषत: कोकणपट्टी परिसरात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस, म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाळ्याची बेगमी म्हणून या परिसरातील तयार केलेली गावठी मिरची व घाटमाथ्यावरून आलेली घाटी मिरची कुटून उत्कृष्ट तिखट गरम व हिरवा मसाला तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
गावठी मिरची बनविण्याची पद्धत
ग्रामीण भागात फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान गावठी मिरचीचे पीक घेतले जाते. यासाठी शेतात नांगरणी करून उत्कृष्ट वाफे बनवावे लागतात. चांगल्या प्रतीच्या बिया रुजत घालून त्यांना योग्य प्रमाणात खतपाणी घालावे लागते. ठरावीक वेळेत गावठी मिरचीची लागवड झाल्यानंतर मिरच्या कुटून जमा करून त्यांचे देठ काढले जातात. त्यानंतर मिरच्या व्यवस्थित सुकवून विक्रीसाठी आणल्या जातात. सध्या आरोंदा, शिरोडा परिसरात मिरची विक्री व्यावसायिक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
गावठी मिरचीचा भाजलेला मसाला व हिरवा मसाला सर्वसामान्य घर ते पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्कृष्ट, चवदार सांबार, आमटी, उसळ, कुरमा, पालेभाज्यांमध्ये वापरला जातो. तसेच हिरवा मसाला उत्कृष्ट चवदार मच्छी कडी, मासे भाजणे (फ्राय) यासाठीही वापरला जातो.
सध्या रेडी, शिरोडा, आरोंदा, आसोली, टांक, आरवली, सोन्सुरे, मळेवाड, धाकोरा, मातोंड, तळवडे, अणसूर या परिसरातील गावठी लाल मिरची व हिरव्या मसाल्याची आवक वाढली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, गडहिंग्लज, बेळगाव, कारवार व गोवा राज्यातील व्यापारी मिरचीसह मसाल्याचे पदार्थ स्थानिक आठवडा बाजारपेठेत विक्री करत असल्याचे दिसत आहे.
तसेच कांदा, नारळ, सुकी, मच्छीसह पावसाळ्यासाठी लागणाऱ्या अन्य वस्तूंच्या किमती महागल्याने सर्वसामान्यांना पावसाळी बेगमीसाठी मसाला खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य गृहिणीला मसाला करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
गरम चवदार मसाला बनविण्यासाठी चांगल्या लाल मिरचीसोबत धणे, जायफळ, खसखस, काळी मिरी, जिरे, लवंग, हळद, जायपत्री, रामपत्री, दालचिनी, शायजिरे, मसाला वेलची, तमालपत्री, दगड फुल, सफेद मिरी या पदार्थांचा वापर केला जातो. या पदार्थांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच गावठी मिरचीच्या उत्पादनामध्ये काम करतेवेळी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याने यापुढील काळात गावठी मिरचीच्या दरात भरमसाठ वाढ होणार आहे, असा अंदाज या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गावठी लाल मिरचीपासून बनविलेल्या गरम मसाल्यापासून आमटी, उसळ, सांबार, कुरमा चवदार होतो. त्यामुळे गावठी मिरचीला अधिक पसंती मिळते. मसाले पदार्थांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य गृहिणीला मसाला बनविणे महाग होत आहे.
- स्रेहा सातार्डेकर
गृहिणी, रेडी-म्हारतळेवाडी
ग्रामीण भागात गावठी
मिरची करतेवेळी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. गावठी मिरचीची देशात व
विदेशात निर्यात झाल्यास या व्यवसायाला चालना मिळून शेतकरी, बागायतदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल.
- प्रसाद रेडकर
व्यावसायिक, रेडी-म्हारतळेवाडी
मिरची दर (प्रति किलो)
घाटमाथ्यावरील काश्मिरी मिरची२०० रुपये
तिखट गुंडर मिरची१२० रुपये
लाल बेडगी मिरची१६० रुपये
गावठी लाल मिरची३०० रुपये
लवंगी मिरची१५० रुपये
मसाला कांडप दर२५ रुपये