अनंत जाधव सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोंडूवर प्रकिया उद्योग नसल्याने दरवर्षी तब्बल दहा हजार मेट्रिक टन बोंडू हा गोव्यातील उद्योजक कवडीमोल भावाने घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात बोंडूपासून वाईन निर्मिती करण्यासाठी तत्कालीन सरकारने परवानगी ही दिली होती.पण वाईन निर्मिती केल्यास तिची विक्री कुठे करायची असा प्रश्न अनेकांना पडल्याने कोणताही उद्योजक वाईन निर्मिती व्यवसायासाठी पुढे आला नाही. परिणामी हा बोंडू मोठ्याप्रमाणात गोव्याला जाऊ लागला आहे. सध्या जिल्ह्यातील दोन संस्थानी वाईन निर्मिती साठी परवानगी ही मागितली पण त्याना ही अद्याप मुर्हतस्वरूप आले नाही.वाईनची विक्री खुल्या बाजारात करण्यावरून संपूर्ण राज्यात वादळ निर्माण झाले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र वाईन निर्मितीला तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी 1960 साली परवानगी दिली होती. मात्र ही परवानगी दिली असली तरी जिल्ह्यात अद्याप पर्यंत एकही वाईन निर्मिती प्रकल्प सुरू झाल्याचे ऐकिवात नाही.उलटपक्षी जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व वेगुर्ले तालुक्यातील गोव्याच्या सिमेला लागून असलेल्या गावातून दरवर्षी गोव्यातील उद्योजक लाखो रूपयांचे बोंडू कवडी मोल भावाने घेऊन जातात.दरवर्षी दहा हजार मेट्रिक टन बोंडू हा गोव्याला जातो. एक पंधरा लिटर तेलाचा डब्बा दहा ते बारा रूपये अशा भावने हा बोंडू खरेदी केला जातो, आणि त्यावर गोव्यात नेऊन या बोंडू पासून वाईन निर्मिती बरोबरच हुराक म्हणून मद्यातील एक प्रकार काढले जाते. हे उद्योजक वर्षाला एक ते दोन कोटिची उलाढाल करतात. परवानगी का देत नाही?जिल्ह्यातील दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील काहि गावात काजू मोठ्याप्रमाणात तयार होतो. त्यातील काजू गर आपला शेतकरी घेतो तर बोंडू तसाच टाकतो आणि हाच बोंडू गोवा कवडीमोल घेऊन जाऊन तेथे प्रकिया करतो मग आपले सरकार येथील बागायतदारांना का परवानगी देत नाही, असा सवाल दोडामार्ग मधील बागायतदार चंद्रशेखर देसाई यांनी केला आहे.
सरकारच्या दुर्लक्षामुळे दहा हजार मेट्रिक टन बोंडू गोव्यात, तत्कालीन सरकारने वाईन निर्मितीस परवानगी दिली पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:48 IST