माव्याची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: June 27, 2014 00:53 IST2014-06-27T00:24:51+5:302014-06-27T00:53:05+5:30
सावंतवाडीत गुन्हा अन्वेषणची कारवाई

माव्याची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात
सावंतवाडी : गोव्याहून कोल्हापूर येथे माव्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो व ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा अन्वेषण व वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी चालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोव्यावरून कोल्हापूरला जाणाऱ्या आयशर टेम्पो (एपी २९ टीए १३६०)ला आज, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता स्थानिक गुन्हा अन्वेषण व वाहतूक पोलिसांनी तपासणीकरिता बोर्डी पुलानजीक थांबविले. या टेम्पोची पाहणी केली असता, गब्बर माव्याचे ६० पाऊचचे ५५ पॅकेट असलेल्या २६ पिशव्या आढळून आल्या. या सर्व मुद्देमालाची किंमत ८८ हजार ८०० रुपये एवढी आहे. यावेळी पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकारी दि. रा. शिंदे यांना तपासणीसाठी बोलाविले. गुटखा, पानमसाला व मावा या पदार्थांना बंदी असल्याने टेम्पो पकडण्यात आला. या कारवाईत पाच लाखांचा टेम्पो व ८८ हजार ८०० रुपयांचा मावा, असा मुद्देमाल पकडण्यात आला आहे.
यातील टेम्पोचालक मोहम्मद निजामुद्दीन अझिमोद्दीन (वय ३८), सय्यद हुसेन मोहम्मद अली (४५) व अब्दुल वहिद रशीद (४८) यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. यादव, बापू खरात, संतोषसावंत, वाहतूक पोलीस चंद्रशेखर मुणगेकर, रविकांत झरकर यांनी केली. (वार्ताहर)