रत्नागिरीच्या समुद्रात ‘तारली’चे साम्राज्य; लाखोंची उलाढाल
By Admin | Updated: November 25, 2014 00:32 IST2014-11-25T00:22:06+5:302014-11-25T00:32:34+5:30
बुडीत व्यावसायिकाला आर्थिक बळ : दक्षिणेकडील राज्यात मच्छिला मोठी मागणी

रत्नागिरीच्या समुद्रात ‘तारली’चे साम्राज्य; लाखोंची उलाढाल
प्रकाश वराडकर- रत्नागिरी -रत्नागिरीच्या समुद्रात सध्या ‘तारली’ मच्छी (आॅईल सार्डिन फीश) चे साम्राज्य असून, यांत्रिक मच्छिमारी नौकांना तारली मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तेल काढण्यासाठी व खाण्यासाठी वापर होणाऱ्या ‘तारली’ मच्छिला कोकणसह गोवा व दक्षिणेकडील राज्यात मोठी मागणी असून, दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे मच्छी व्यावसायिकांना आर्थिक बळ मिळाले असून, मिरकरवाडा बंदरात लाखोंची उलाढाल होत आहे.
प्रत्येक हंगामात नैसर्गिक अडचणींमुळे मच्छी व्यावसायिक अडचणीत येत होता. मात्र, आता त्यांच्या मदतीला तारली मासा धावून आला आहे. त्यामुळे बिघडलेली आर्थिक गणिते जुळली आहेत. तारलीचा हा हंगाम आणखी काही दिवस चालेल, अशी माहिती जाणकार मच्छिमारांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रत्नागिरीचे मिरकरवाडा हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे मच्छिमारी बंदर असून, याठिकाणी ५००पेक्षा अधिक यांत्रिक मच्छिमारी नौका आहेत. तर मिरकरवाडासह जिल्ह्यातील जयगड, नाटे, वरवडे, हर्णै या सर्व बंदरात मिळून तीन हजारांवर मच्छिमारी नौका आहेत. गेल्या चार दिवसांपासून तारलीमुळे दररोज २ ते ५ लाखांचे उत्पन्न प्रत्येक मच्छिमारी नौकेला मिळत आहे. त्यामुळे सध्या कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)
रस्तेमार्गे तामिळनाडू, केरळ प्रवास...
चार दिवसांपूर्वी पेडी मच्छी समुद्रात मिळत होती. मात्र, त्यानंतर तारली मिळू लागली. त्याला चांगला दर मिळत असल्याने व्यावसायिकांत समाधान आहे. दक्षिण भारतात तारली दररोज पाठविली जात आहे. मिरकरवाडा बंदरातून दररोज २० ते २२ इन्सुलेटेड (हवाबंद) वाहनांत भरून तारली गोवा, भटकळ, मलपी, जांबुली, मंगलोर, केरळ भागात पाठविली जात आहे. प्रत्येकी ३५ ते ४० किलो तारली असलेले २०० टब एका गाडीत ठेवले जातात, अशी माहिती मच्छी व्यावसायिक नदीम सोलकर यांनी दिली.
तारलीपासून तेल, पावडर...
तारलीपासून काढले जाणारे तेल हे देशातून अन्य देशात निर्यात केले जाते. हे तेल प्युरिफाईड करून विविध उत्पादनांत वापरले जाते. तसेच आॅईलपेंटमध्येही या तेलाचा वापर केला जातो. तारलीच्या लगद्याची पावडर बनविली जाते. ही पावडर खतांमध्ये, पशुखाद्यांमध्ये वापरली जाते. बहुपयोगी तारली मच्छिला त्यामुळे चांगला दरही मिळत आहे. रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये तारलीचे तेल काढणारे व पावडर बनविणारे संपूर्ण स्वयंचलित यंत्रसामग्री असलेले दोन कारखाने आहेत.
बांगड्यापेक्षा तारली बरी...
गेल्या चार ते पाच वर्षात हवामान, वादळांमुळे मच्छिमारी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यंदाही हंगामाच्या सुरुवातीला खराब हवामान, वादळसदृश स्थिती होती. त्यामुळे नौका मालकांना उत्पन्न मिळत नसतानाही इंधनावर व खलाशांवर खर्च करावा लागत होता. गेल्या आठवड्यात मात्र सागराने मच्छिमारांना साथ दिली आहे. बांगडा मच्छि मिळाली तरी त्यातून मिळणारे उत्पन्न हे कमी असल्याने तारलीच्या कॅचमुळे मच्छी व्यावसायिकांत समाधान आहे. ३२ ते ३५ किलो तारलीच्या टबला सध्या ४५० ते ५५० रुपये दर मिळत आहे.