मालवण बंदर विभागाला टार्गेट
By Admin | Updated: January 7, 2015 23:55 IST2015-01-07T22:31:19+5:302015-01-07T23:55:54+5:30
पर्यटन व्यावसायिक आक्रमक : करमणूक करासाठी मालवणात बैठक

मालवण बंदर विभागाला टार्गेट
मालवण : अधिकृत परवान्यानुसार बंदरात बोटींग व्यवसाय करीत असताना अनधिकृत बेकायदेशीर बोटींग करणाऱ्या व्यावसायिकांना बंदर विभाग तथा मेरिटाईम बोर्डाकडून अभय दिले जाते. गेल्या तीन वर्षात एकाही अनधिकृत बोटींग व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली नाही. यामुळे तारकर्ली, देवबाग व मालवण येथे बोटींग व्यावसायिकांमध्ये आपापसात वाद निर्माण झाले. याला बंदर विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असा थेट आरोप येथील पर्यटन व्यावसायिकांनी केला. यावर तहसीलदार वनिता पाटील यांनी बंदर विभागाबाबत बोटींग व्यावसायिकांच्या तक्रारी असल्याने वरिष्ठांना लेखी कळविणार असल्याचे सांगितले.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या आदेशानुसार बुधवारी तहसील कार्यालयात करमणूक कराच्या आकारणीसंदर्भात पर्यटन व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंडल अधिकारी मंगेश तपकिरकर, रामचंद्र कुबल, मनोज खोबरेकर, संजय केळुस्कर, रूपेश प्रभू, दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, डॉ. पांडुरंग कासवकर, मंगेश सावंत, सदा तांडेल, मोहन केळुस्कर, गजा कुबल यांसह अन्य बोटींग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्टस, स्कुबा डायव्हींग व्यावसायिक उपस्थित होते.
रामचंद्र कुबल म्हणाले, मेरिटाईम बोर्ड तथा बंदर विभागाकडून अद्याप अनधिकृत प्रवासी बोटींग वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेली नाही. बंदर विभागाकडून याउलट परवाना धारकांवर कारवाई केली जाते. आम्ही अधिकृतपणे बोटींग व्यवसाय करीत असून त्यासाठी संस्थाही स्थापन केली आहे.
शासनाला आमचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. बंदर विभागाच्या डोळेझाकपणामुळे मागील वर्षात सुमारे साडेतीन लाखांचा महसूल बुडाला आहे. बंदर अधिकारी शासनाची आणि जनतेची फसवणूक करतात. अनधिकृत बोटींग व्यवसायावर बंदर विभागाने कडक कारवाई सुरू केली पाहिजे, असेही कुबल म्हणाले.
आम्ही परवानाधारक आहोत तरीही बंदर विभाग आम्हाला नाहक त्रास देत असल्याचे संजय केळुस्कर म्हणाले. बंदर विभागाच्या चुकीच्या कारवाईमुळे मला नाहक ६० हजार रूपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.
यावेळी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत म्हणाले, किल्ला पाहण्यासाठी पर्यटन हंगामात बहुसंख्येने अभ्यासगट व शालेय सहली येत असतात. अशावेळी शालेय मुलांकडून पर्यटन कर कसा वसूल करणार? यावेळी बोटींग व्यावसायिक दामोदर तोडणकर म्हणाले, पर्यटन कराची आवश्यकता आहे. पण याबरोबरच बोटींग व्यवसायात सुरू असलेली दलाली थांबली पाहिजे.
पर्यटन व्यवसायात सुसूत्रता येण्यासाठी बोटींग, वॉटर स्पोर्टस, स्कुबा डायव्हींग यांच्यासाठी एक खिडकी सुरू करण्यासाठी शासनाने पावले उचलणे आवश्यक
आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत
आहे. (प्रतिनिधी)
४ मालवण तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीस अतिमहत्त्वाची जबाबदारी बजावणाऱ्या मालवण बंदर विभागाचे बंदर निरीक्षक आर. जे. पाटील हे अनुपस्थित होते. बंदर विभागामार्फत प्रतिनिधी सहाय्यक बंदर निरीक्षक एस. वाय. सिकलिकर हे उपस्थित होते. याबाबत तहसीलदार वनिता पाटील यांनी पाटील यांच्या अनुपस्थितीबाबत सिकलिकर यांना जाब विचारला. यावेळी सिकलिकर यांनी पाटील हे विजयदुर्गला गेल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी बंदर निरीक्षकांना बैठकीबाबत लेखी व तोंडी सूचना करण्यात आल्या होत्या. तरीदेखील बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत नाराजी व्यक्त केली.
मनोरंजन कर आवश्यक
मुंबई पोलीस अधिनियमानुसारच मनोरंजन कर वसूल केला जाणार आहे. यासाठी २००३ मध्ये नियमावली तयार करण्यात आली आहे. यासाठीचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी केले जातील. ही एक चांगली प्रक्रिया असून वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांनी शासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. मनोरंजन कर हा आवश्यक आहे.
- वैशाली पाटील,
तहसीलदार, मालवण