वैभववाडी: मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कळे दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे वैभववाडी-गगनबावडामार्गे कोल्हापूर वाहतूक बंद करण्यात आली आहे. तालुक्यात संततधार सुरु असल्याने सर्व नद्यांना महापूर आला आहे.तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कळे दरम्यान सांगशी, मांडुकली, असळज, खोकुर्ले, शेणवडे, किरवे, लोंघे येथील रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कळे, गगनबावडा, वैभववाडी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. करुळ येथील तपासणी नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच गगनबावडा या ठिकाणी वाहने थांबविण्यात आली आहेत. कुंभी धरणातून १३१० क्युसेक तर वीजनिर्मितीसाठी ३०० क्युसेक असा एकूण १६१० क्युसेक पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरु होता. त्यामध्ये मंगळवारी(ता.१९) सकाळपासून या विसर्गात पुन्हा १३०० क्युसेक पाण्याची वाढ केली जाणार असल्यामुळे रस्त्यावरील पाणी पातळी आणखीन वाढणार आहे.
Sindhudurg: तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद, ठिकठिकाणी वाहने पडली अडकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:03 IST