‘ब्रुसोलेसिस’बाबत दक्षता घ्या
By Admin | Updated: July 23, 2014 21:54 IST2014-07-23T21:45:44+5:302014-07-23T21:54:54+5:30
संदेश सावंत : जिल्हा परिषद पशुसंवर्धन समिती सभा

‘ब्रुसोलेसिस’बाबत दक्षता घ्या
सिंधुदुर्गनगरी : जनावरांच्या मलमुत्रापासून होणाऱ्या ब्रुसोलेसिस या तापाच्या साथीला आळा घालण्यासाठी जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. ही लस अत्यंत धोकादायक असून ही लस माणसाच्या अंगावर पडल्यास संबंधित व्यक्तीस अपंगत्व येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रुसोलेसिस प्रतिबंधात्मक मोहीम राबविताना अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती सभापती संदेश सावंत यांनी सभेत दिले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य आत्माराम पालयेकर, धोंडू पवार, सदानंद देसाई, नासीर काझी, मैथिली तेली, प्रियंका गावडे, समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. के. चंदेल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.ब्रुसोलेसिस ही जनावरांसाठी असलेली लस देताना त्यातील एक थेंब जरी व्यक्तीच्या अंगावर पडला तर त्या व्यक्तीस अपंगत्व येण्याचा धोका असल्याचा मुद्दा नासीर काझी यांनी उपस्थित केला.
ही लस धोकादायक असल्याने ती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्या. तसेच ही लस देण्यासाठी आवश्यक असलेले गमबुट, गॉगल्स, हॅण्डग्लोज, मास्क आदी साहित्याचा पुरवठा करावा व शेतकऱ्यांनाही दक्षतेच्या सूचना द्याव्यात, असे आदेश देण्यात आले. यावर खुलासा करताना डॉ. चंदेल यांनी सर्व साहित्य संबंधितांना देण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांनी लसीकरणाच्यावेळी त्यांच्या वासरांना फक्त धरण्याचे काम करावयाचे असल्याचे स्पष्ट केले.
वैभववाडी तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारत दुरूस्तीची कामे रेंगाळल्याबाबत सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नेर्ले येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा मार्ग त्वरित मार्गी लावण्याचे आदेश दिले. तसेच पुन्हा पुन्हा हा विषय सभागृहात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले. (प्रतिनिधी)
---१९२८० वासरांना दिली जाणार लस
वैभववाडी तालुक्यातील १ हजार २००, सावंतवाडी- ३ हजार ४००, कणकवली- २ हजार ८००, देवगड- १ हजार ८००, दोडामार्ग- १ हजार ८०, मालवण- २ हजार १०० अशी गायी व म्हैशी यांची ४ ते १२ महिने वयोगटातील १२ हजार २८० वासरांना ब्रुसोलेसिस प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
१० लाख रूपये अन्यत्र वळवले
--पशुवैद्यकीय दवाखान्यांना हत्यारे पुरविणे या हेडखाली १० लाख रूपये निधी मंजूर होता. यातील प्रत्येकी ५ लाख असे एकूण १० लाख रूपये पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम व दुरूस्तीसाठी वळविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी दिली.