कणकवली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांदा ते खारेपाटणपर्यंत महामार्ग भूसंपादन सीमांकन (आरओडब्ल्यू) मध्ये ज्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत ५ मे पर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच राजकीय दबावापोटी एका विशिष्ट धर्माला अथवा विरोधी पक्षातील व्यक्तींना टार्गेट करून चुकीच्या पद्धतीने अनधिकृत नसलेले त्यांचे बांधकाम हटविण्याची कारवाई अधिकाऱ्यांनी करू नये. तसे झाल्यास शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असेही सुनावले.माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता अतुल शिवणीवर, सहायक कार्यकारी अभियंत्या वृषाली पाटील, सहायक अभियंता बी.जे.कुमावत यांची शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी भेट घेतली. यावेळी मधुरा पालव, कन्हैया पारकर, तेजस राणे, मज्जीद बटवाले आदी उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात यासह अन्य प्रलंबित प्रश्न व समस्यांवरून उद्धवसेनेच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. महामार्ग संदर्भातील प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना सिंधुदुर्गात बोलवून त्यांच्यासमवेत आमची बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. नांदगाव येथील कारवाई राजकीय दबावापोटी महामार्ग प्राधिकरणने अलीकडेच नांदगाव येथे स्टॉलवर कारवाई केली होती. ही कारवाई राजकीय दबावापोटी करण्यात आली होती, असा आरोप नांदगावातील मुस्लिम बांधव व स्टॉलधारकांनी केला. अधिकाऱ्यांच्या या कृतीबद्दल राजन तेली, परशुराम उपरकर, वैभव नाईक,सतीश सावंत,संदेश पारकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राजकीय दबावापोटी व चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई करत असाल तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.बांदा ते खारेपाटण हद्दीत आवश्यकता नसतानाही बांधकाम बांदा ते खारेपाटण हद्दीत महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या हद्दीत प्राधिकरणकडून सर्व्हिसरोडसह अन्य कामे हाती घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी काम करण्याची आवश्यकता नसतानाही बांधकाम केले जात असून हा जनतेच्या पैशांचा चुराडा आहे, असा आरोप त्यांनी केला. महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने काय उपाययोजना केल्या, तळेरे-वैभववाडी रस्त्याचे काम का रखडले यावरून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. राणेंकडून न्यायाची अपेक्षा काय करायची ?प्राधिकरणचे तत्कालीन अधिकारी प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक व त्यांना मारहाण करणारे आमदार नितेश राणे आता पालकमंत्री झाले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा काय करायची ? असा टोला संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.
Sindhudurg: अनधिकृत बांधकामांबाबत ५ मे पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..; उद्धवसेनेने दिला इशारा
By सुधीर राणे | Updated: April 21, 2025 16:58 IST