‘त्या’ वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन
By Admin | Updated: June 27, 2014 01:01 IST2014-06-27T00:58:27+5:302014-06-27T01:01:50+5:30
वेंगुर्लेत विद्यार्थिनीच्या हस्ते शुभारंभ : दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीचा पुढाकार

‘त्या’ वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन
वेंगुर्ले : वेंगुर्ले कॅम्प येथील मुलींचे वसतिगृह बांधून तीन वर्षे उलटले तरी समाजकल्याण विभागाकडून याचा शुभारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना या वसतिगृहाचा उपयोग होण्यासाठी गुरुवारी दलित अत्याचार विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन विद्यार्थिनी शिल्पा जाधव हिच्याहस्ते करण्यात आले.
वेंगुर्ले कॅम्प येथे सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय वसतिगृहाचे पाठपुरावा करुनही गेल्या तीन वर्षात उद्घाटन करण्यात आलेले नाही. सर्व व्यवस्था पूर्ण असतानाही उद्घाटन न केल्याने मागासवर्गीय विद्यार्थिनींचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे दलित अत्याचार विरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिवसाचे औचित्य साधून या वसतिगृहाचे प्रतिकात्मक उद्घाटन विद्यार्थिनी शिल्पा जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष महेश परुळेकर, एकनाथ जाधव, मिलींद वेंगुर्लेकर, अमिन हकीम, वामन कांबळे, वासुदेव जाधव, लाडू जाधव, कानू परुळेकर, अॅड. सुषमा प्रभू खानोलकर, शशांक मराठे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. तसेच शासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. या वसतिगृहात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे. यासाठी दलित अत्याचार विरोधी संघर्ष कृती समितीचे जिल्हा निमंत्रक महेश परुळेकर, स्वाती तेली यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन शशांक मराठे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)