चोरद नदीतील दूषित पाण्याचा गावांना पुरवठा ?

By Admin | Updated: January 7, 2015 23:53 IST2015-01-07T22:29:20+5:302015-01-07T23:53:45+5:30

पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे

Supply of contaminated water to river Chorad? | चोरद नदीतील दूषित पाण्याचा गावांना पुरवठा ?

चोरद नदीतील दूषित पाण्याचा गावांना पुरवठा ?

श्रीकांत चाळके -खेड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना करण्यात येत असलेला पाणीपुरवठा सालाबादप्रमाणे यावर्षीही संवेदनशील होणार आहे. गेले काही वर्षे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत आहे. ज्या चोरद नदीतून पाणीपुवठा केला जातो, त्याच नदीतील पाणी दूषित झाल्याने संबंध टंचाईग्रस्त गावांमध्ये खळबळ उडाली आहे. हेच दूषित पाणी सध्या टंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना पुरवण्यात येणार असल्याने यानिमित्ताने आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.़ तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांनी याबाबत योग्य ती दक्षता घेणे आवश्यक असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़
खेड तालुक्यातील नातूवाडी येथील धरणातून पाणी सोडले जात आहे़ हे पाणी सुकिवलीमार्गे खेड शहराला पुरविले जात आहे.़ धरणातील या पाण्यामुळे सुकिवली येथील चोरद नदीला वर्षभर पाणी असते़
याच पाण्यामुळे खेड शहरातील नागरिकांची पाण्याची सोय होत आहे. तालुक्यातील याच नदीतील पाण्यामुळे टंचाईग्रस्तांचीदेखील तहान भागविली जात आहे़ वर्षानुवर्षे हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, गेले काही वर्षे जानेवारी ते जून महिन्यादरम्यान विविध कारणांनी या नदीतील पाणी दूषित आहे़ तात्पुरता उपाय शोधण्याखेरीज प्रशासनाने आणि संबंधित ग्रामपंचायतीने आजपर्यंत काहीही केलेले नाही़ या नदीत कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरे धुणे आदी प्रकार नित्याचेच होत आहेत़ आजही असे प्रकार सुरू आहेत़ विविध प्रकारची वाहने धुतली जात असल्याने या नदीतील पाणी दूषित झाले आहे़ वाहने धुतल्याने वाहनातील आॅईल पाण्यावर तरंगत असते़ याच नदीकिनारी परप्रांतीय कामगारांची वस्ती आहे. हे सर्व कामगार याच पाण्यात आंघोळ करीत आहेत़ यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच दूषित पाणी खेड शहराला प्यावे लागत आहे़ यावर्षीही तालुक्यातील खवटी, तुळशी आणि दिवाणखवटी या ३ गावांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे़ खासगी टँकरद्वारे पैसे घेऊन पाणी पुरवले जात असल्याचे समोर आले आहे़
काही लीटर पाण्याचा उपसा करण्याचा परवाना असूनही परवान्याच्या शंभर पट दूषित पाणी खासगी टँकरद्वारे उपसले जात आहे.़ सुकिवली आणि भरणे ग्रामपंचायतींनी याबाबत प्रतिवर्षी उपाययोजना करूनही हे पाणी दूषित करण्यात येत आहे. तहसीलदारांकडून कारवाईचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, या फलकांवरील आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत़ आता तहसीलदारांनी देखील याबाबत सत्वर पावले उचलणे आवश्यक झाले आहे़ तालुक्यात पाण्याचे ४६ नमुने दूषित असल्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर देखील या पाण्याच्या शुध्दिकरणाकडे डोळेझाक का केली जात आहे़
तहसीलदार किंवा संबंधित ग्रामपंचायतीने या नदीकिनारी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. नातूनगर येथील धरणातून होणारा हा पाणीपुरवठा एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने पुढे काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Supply of contaminated water to river Chorad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.