हिरवाईनी नटलेली शेतशिवारे सुनीसुनी
By Admin | Updated: May 29, 2015 23:46 IST2015-05-29T22:05:37+5:302015-05-29T23:46:17+5:30
वन्यप्राण्यांचा उपद्रव : अवानावर येथील शेतकरी हैराण

हिरवाईनी नटलेली शेतशिवारे सुनीसुनी
सुरेश बागवे - कडावल--कधीकाळी अवानाची हिरवीगार दुलई अंगाखांद्यावर मिरवत कुसगाव-गिरगावमधील शिवारे संथ वाऱ्यासंगे मुक्तपणे डोलायची; परंतु आता चित्र पालटले आहे. अवानावर वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची गडद छाया निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबरोबरच परडी-परसूही कमी झाल्याने अवान निर्मितीही घटली आणि हिरवाईच्या श्रीमंतीने नटली-सजलेली येथील शेतशिवारे अवानाशिवाय सुनीसुनी दिसू लागली.
‘अवान’ हा शब्द तेव्हा जनमानसात चांगलाच प्रचलित होता. पूर्वी पंचक्रोशीतील बहुतांश शेतकरी उन्हाळी पिकांमध्ये कुळीथ, चवळी, नाचणी, वाल, वांगी तसेच इतर भाजीपाल्यांच्या पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणात कांदे व मिरचीचे उत्पादन घेत असल्याने अवानाला मोठी मागणी होती. अवान विकत घेऊ इच्छिणारे शेतकरी या पारंपरिक रोपवाटिकेत जाऊन रोपांचा दर्जा पाहून ओळीवरच सौदा पटवून व्यवहार करीत असत, तर अवान रुजविणारे शेतकरी काही वेळा आठवडा बाजारात आपल्या मालाची विक्री करीत. मात्र, हा व्यवहार रोपवाटिकाधारक शेतकऱ्यांना अनेकवेळा अडचणीचा ठरे. कारण बाजारात या बियाण्याच्या रोपांची विक्री झाली नाही, तर त्यांचे मोठे नुकसान होत असे.
अवान निर्मितीपासून हंगामी स्वरुपात रोजगार मिळे, तर परिसरातील शेतकऱ्यांना लागवडीसाठी चांगल्या दर्जाची रोपे उपलब्ध होत. आसपासच्या कित्येक गावांमधील शेतकरी पूर्वी कुसगाव-गिरगाव येथूनच मिरची, कांद्याचे अवान नेऊन आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असत. अवानामुळे कित्येक शिवारे हिरवीगार होऊन डोलायची.
उन्हाळी शेती घटली
वन्यप्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवाचा परिणाम अवान निर्मितीच्या व्यवसायावर होऊ लागला. रानडुक्कर, माकडे, हरीण, भेकरे, ससे, गवे यासारखे वन्य प्राणी अवानाचे वाफे उद्ध्वस्त करू लागले आणि या व्यवसायाला उतरती कळा लागली. ही समस्या एवढी विकोपाला गेली की, नंतर येथील शेतकऱ्यांनी अवान रुजविण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबविली, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी शेती करणे थांबविले. उन्हाळी शेतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवानाला मागणीही कमी झाली. अवान नाही, म्हणून उन्हाळी शेती नाही आणि उन्हाळी शेती नाही, म्हणून अवानाची निर्मिती नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.
पारंपरिक व्यवसाय
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुसगाव व गिरगाव या गावांमधील शेतकरी उन्हाळी शेतीसाठी आवश्यक असलेले ‘अवान’ म्हणजे बियाण्याच्या रोपांची निर्मिती पिढ्यान्पिढ्या करीत
असत.
पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे चालत आलेल्या या रोपवाटिकेतील निर्मिती ही प्रामुख्याने कांदे व मिरचीच्या अवानाची असायची.