मोंड येथे नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या
By Admin | Updated: May 17, 2015 01:36 IST2015-05-17T01:36:50+5:302015-05-17T01:36:50+5:30
कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली

मोंड येथे नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या
पुरळ : पती बोलल्याचा राग मनात धरून मोंड झरकरवाडी येथील ईशा एकनाथ झरकर (वय १९) या नवविवाहितेने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी पहाटे ५.३० वाजण्यापूर्र्वी मोंड झरकरवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी मोंड झरकरवाडी येथील एकनाथ माधव झरकर याच्याशी तिचा विवाह झाला होता. तिचे माहेर गोवळ येथे असून शुक्रवारी रात्री तिला पतीने तू घरात बसून का राहिलीस, काम करत का नाहीस असे विचारले. त्याचा राग येऊन घरातील आंबा फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक रागाच्या भरात तिने प्राशन केले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने पती एकनाथ झरकर यांनी उपचारासाठी देवगड येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना तिचा शनिवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.
देवगड पोलीस ठाण्यात एकनाथ झरकर यांनी माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी
पाटे करीत आहे. एक वर्षापूर्वीच
विवाह झालेल्या ईशा झरकर या नवविवाहितेने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. या घटनेने मोंड पंचक्रोशीत खळबळ उडाली असून आत्महत्या करण्यामागे नेमके कारण कोणते याचा तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)