आत्महत्या केलेला युवक चंदगडचा

By Admin | Updated: June 25, 2014 00:40 IST2014-06-25T00:36:47+5:302014-06-25T00:40:09+5:30

आत्महत्येचे कारण अस्पष्ट; वडिलांनी पटवली ओळख

Suicide victim Chandgad's | आत्महत्या केलेला युवक चंदगडचा

आत्महत्या केलेला युवक चंदगडचा

सावंतवाडी : येथील जुन्या न्यायालयाच्या खोलीत चार दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटल्यानंतर त्या युवकाचा ठावठिकाणा कोणालाच मिळत नव्हता. अखेर आंबोली पोलिसांनी मंगळवारी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. युवक चंदगड येथील असल्याचे निष्पन्न झाले. युवकाचे नाव महेश सुब्बराव सुरतकर (वय १५, रा. माणगाव, लाकूरवाडी) असे आहे. किरकोळ वादातून तो तीन महिन्यांपूर्वी घरातून निघून गेल्याची माहिती वडील सुब्बराव यांनी पोलिसांना दिली.
२१ जून रोजी सावंतवाडी येथील जुन्या न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत महेश याने झाडाच्या मुळांचा गळफास लावून आत्महत्या केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली. पण या युवकाबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
आत्महत्येपूर्वी १९ जूनला हा युवक बांदा येथे पोलिसांना आढळून आला होता. त्यावेळी बांदा पोलिसांनी त्याच्या पूर्ण माहितीसह फोटोही घेऊन ठेवला होता. यावेळी त्याने, आपण सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूलचा विद्यार्थी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी तपासाचा रोख सावंतवाडीकडे वळवला होता. पण सोमवारी आंबोली दूरक्षेत्रामध्ये चंदगड येथून एक शाळकरी मुलगा बेपत्ता असल्याचे पत्र आले.
तसेच त्या मुलाचा फोटोही पोलीस कॉन्स्टेबल नितीन उमरजकर यानी शोधून काढला. त्या फोटोवरून आणि चंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर हा युवक चंदगड येथीलच असल्याचे स्पष्ट झाले.
मुलाच्या वडिलांना याबाबत कल्पना दिल्यानंतर मंगळवारी ते नातेवाईकांसह सावंतवाडीत दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तो मृतदेह आपल्या मुलाचाच असल्याचे त्यांनी सांगितले. सुब्बराव यांच्या माहितीनुसार, महेश नववीत शिकत होता. २३ मार्च २०१४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तो घरातून सायकल घेऊन गेला होता. यावेळी आपण त्याला कुठे जातोस, असे विचारल्याचे वडिलांनी सांगितले.
महेश याला दोन भावंडे असून या तिन्ही भावंडांची आई मुले लहान असतानाच त्यांना सोडून गेली. त्यांचे पालनपोषण सावत्र आईने केले असून घरात कोणताही वाद नाही, असा दावाही सुब्बराव यांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह महेश याचाच असल्याची खात्री पटल्यानंतर वडील आणि नातेवाईकांचे जाबजबाब घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide victim Chandgad's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.