प्रभूंच्या घोषणांचे ‘सुदर्शन’ कोकण रेल्वेला तारणार!

By Admin | Updated: January 6, 2015 23:59 IST2015-01-06T22:20:50+5:302015-01-06T23:59:58+5:30

नागरी सत्कार : विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमधून कोकण रेल्वे विकासाची नांदी

Sudarshan will save Konkan Railway by announcements of Lord! | प्रभूंच्या घोषणांचे ‘सुदर्शन’ कोकण रेल्वेला तारणार!

प्रभूंच्या घोषणांचे ‘सुदर्शन’ कोकण रेल्वेला तारणार!

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -गेल्या १५ वर्षाच्या काळात कोकण रेल्वेमध्ये कोकण कुठे आहे, असे विचारण्याची वेळ कोकणवासियांवर आली. नाव कोकणचे अन लाभ दक्षिणात्यांना, अशी स्थिती निर्माण झाली. कोकणवासियांना वाली उरला नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रत्नागिरीत त्यांच्या नागरी सत्कारावेळी कोकण रेल्वेबाबत ज्या घोषणा केल्या आहेत, त्यातून कोकण रेल्वेच्या विकासाची नांदी झाली आहे. त्यांच्या घोषणांचे ‘सुदर्शन’ कोकण रेल्वेला दुष्टचक्रातून निश्चितपणे बाहेर काढेल, अशीच कोकणवासियांची भावना आहे.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला मोठे यश मिळाले. वाजपेयी मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री म्हणून काम केलेल्या प्रभू यांना मोदी यांनीही पसंती दिली. प्रभू हे संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याकडे रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांची तेजस्वी परंपरा असलेल्या कोकणचा हा गौरवच होता. प्रभू यांच्या रेल्वेमंत्रीपदामुळे कोकण रेल्वेबाबतच्या अनेक समस्या सुटतील, अशी आशा कोकणवासीयांमध्ये पल्लवीत झाली आहे.
कोकणच्या या परंपरेचा गौरव करण्यासाठी रत्नागिरीकर एकवटले. रत्नागिरी, देवरुख येथे प्रभू यांचा नागरी सत्कार झाला. यामध्ये अपवादवगळता सर्वपक्षीय नेतेही सहभागी झाले. घरातल्यांकडून पाठीवर प्रेमाचा हात फिरल्याने प्रभूही भारावले. परंतु सत्काराआधी सत्कार्य करू द्या, असे सांगत सत्काराला उत्तर देत प्रभूंनी रत्नागिरीकरांच्या हृदयालाच हात घातला. गेल्या दहा वर्षात रेल्वेवर अत्याचार झाल्याचे सांगत कोकण रेल्वे ही खऱ्या अर्थाने कोकणवासीयांना कशी लाभदायी ठरेल, यासाठी महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
मंत्री झाल्यापासूनच त्यांनी कोकण रेल्वेच्या समस्या सोडविण्याचा ध्यास घेतल्याचे स्पष्ट झाले. सर्वप्रथम त्यांनी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर कोकणी मेवा विक्रीसाठी ठेवण्याचे जे निर्देश दिले, त्यामुळे कोकण रेल्वेबाबत व कोकणबाबत प्रभूंना कोणत्या दिशेने जायचे आहे, याचे संकेतच त्यांनी प्रशासनाला दिले.
२०१४ या वर्षात कोकण रेल्वेमार्गावर प्रवासी व मालवाहतूक गाड्यांचे सहा अपघात झाले. हा रेल्वेमार्ग १७ वर्षांपूर्वीचा आहे. रेल्वे ट्रॅक बदलण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच या मार्गाचे सेफ्टी आॅडिट करण्याची महत्त्वाची घोषणा प्रभू यांनी केली. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या पूर्ततेची घोषणाही त्यांनी केली. कोकण रेल्वेसह राज्यातील रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याबरोबर महामंडळ स्थापन केले जाणार आहे. कोकण रेल्वेच्या विकासासाठी ३० कोटीपर्यंतचे प्रकल्प कोकण रेल्वे स्वतंत्रपणे उभारू शकणार आहे.
कोकणातील उत्पादने देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत. कोकण रेल्वेची सर्व स्थानके स्वच्छ ठेवली जाणार आहेत. कोकम सरबतही देशभरातील रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोकणची पर्यटन क्षमता मोठी आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या स्थानकांबाहेर रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांना पर्यटकांचे मार्गदर्शक अर्थात टुरिस्ट गाईड म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यातून रिक्षाचालकांचे उत्पन्नही वाढणार आहे. कोकण रेल्वे विकासासाठी प्रभू यांचे हे व्हिजन उत्तम आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांच्या काळात कोकण रेल्वेच्या कोकणातील समस्यांची निश्चितपणे उकल होईल, अशी अपेक्षा आहे. प्रभू हे केंद्रातील भाजपाचे मंत्री आहेत. परंतु रत्नागिरीतील सर्वपक्षीय मान्यवर नेते, पदाधिकारी पक्षीय अभिनिवेश बाजुला ठेवत त्यांच्या सत्काराला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे प्रभू यांच्यावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे.

रेल्वेचे दुपदरीकरण पूर्ण व्हावे
कोकण रेल्वेमार्ग हा एकेरी असल्याने क्रॉसिंगसाठी बराच वेळ वाया जातो. गाड्यांची संख्याही वाढविता येत नाही. त्यामुळे कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्याची घोषणाही प्रभू यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, सावंतवाडी, चिपळूण, रत्नागिरी येथून कोकणवासीयांसाठी स्वतंत्र प्रवासी गाड्यांची मागणी आहे. रत्नागिरीतून दादर पॅसेंजर दररोज भरून वाहते. त्यामुळे येथून दुसरी पॅसेंजर रेल्वे सुरू होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे कोकणात पाऊस अधिक असल्याने सर्व स्थानकांवरील निवारा शेड्स पूर्ण प्लॅटफॉर्मवर असले पाहिजे या खासदार विनायक राऊत यांच्या मागणीचाही विचार होणे आवश्यक आहे.

Web Title: Sudarshan will save Konkan Railway by announcements of Lord!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.