उसाचे यशस्वी उत्पादन

By Admin | Updated: July 27, 2015 00:21 IST2015-07-26T22:14:14+5:302015-07-27T00:21:40+5:30

वर्षा उगवेकर : शेतजमिनीत विविध पिके घेण्यावर भर

Successful production of sugarcane | उसाचे यशस्वी उत्पादन

उसाचे यशस्वी उत्पादन

निरजनीकांत कदम -कुडाळ आधुनिक व प्रगत शेतीचा वसा घेतलेल्या प्रगतशील महिला शेतकरी वर्षा नीलेश उगवेकर यांनी त्यांच्या मुंबई - गोवा महामार्गालगतच्या वेताळबांबर्डे येथील एक एकर जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले. याच बरोबर आजूबाजूच्याही शेतजमिनी भाडेतत्त्वावर घेऊन ऊस, सोनचाफा, भाजीपाला या पिकांसह विविध पिके घेत गेली पाच ते सहा वर्षे त्या यशस्वी उत्पादन घेत आहेत. शेतीमधील त्यांचे कार्य सर्व शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देणारे आहे.
वर्षा उगवेकर या गेली अनेक वर्षे शेती व्यवसायात असून, कुडाळ तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई - गोवा महामार्गावर पणदूर वेताळबांबर्डे येथील पुलाजवळील नदी किनारी त्यांची एक एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये गेली अनेक वर्षे पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करीत असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत.
उगवेकर यांनी इस्त्रायलच्या धर्तीवर आंब्याच्या ६५ कलमांची सधन पध्दतीने चार गुंठे क्षेत्रात लागवड केली असून, गेल्या वर्षीपासून आंब्याचे उत्पादनही घेण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही वर्षात प्रतिकलम ६० किलो उत्पादन मिळणारच, असा त्यांचा विश्वास आहे.
सन २००९ साली भारतीय स्टेट बँक शाखा, कुडाळ यांच्याकडून गांडूळखत युनिट उभारणीसाठी चार लाख व शोभिवंत मत्स्यपालन युनिटसाठी चार लाख असे कर्ज घेऊन दोन्ही युनिट चांगल्या स्थितीत चालवून बँकेचे कर्ज फेडून तीन लाख नफाही मिळविला.
बँक आॅफ इंडियाकडून नर्सरीसाठी १० लाख कर्ज घेऊन शेतीबरोबरच नर्सरी व्यवसायाचीही यशस्वी उभारणी केली. प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणाऱ्या उगवेकर यांनी शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचाही वसा प्रामुख्याने सोडला नाही, हे विशेष. एक एकरामध्ये उसाचे उत्पन्न दरवर्षी घेऊन ते या उसाच्या शेतीपासून एकरी सव्वा लाखाचे उत्पादन घेतात.
शेतीबरोबरच बँकेचे आर्थिक सहाय्य घेत वेताळबांबर्डे येथेच नर्सरी सुरू केली आहे. ही नर्सरी कोकण सृष्टी या नावाने ओळखली जाते. या नर्सरीत येथील पारंपरिक फळ-फुल झाडांबरोबरच पेरू, चिकू, लिंबू, जाम, नीलफणस, केळी, पपई, गुलाब, जास्वंद, मोगरा, सोनचाफा, जायफळ, मिरी, दालचिनी, आॅल स्पायसेस मसाल्याची झाडे व इतर विविध झाडे, बदाम व शोभेच्या झाडांचेही उत्पादन घेतले जाते.
पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न
शेतीबरोबरच येथे येणाऱ्या पर्यटकाला मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता यावा, याकरिता उगवेकर यांनी कृषीपर्यटन कें द्र सुरू केले आहे. येथील शेतातील ताज्या पालेभाज्या, कडधान्ये व इतर पदार्थांचा वापर करीत खास मालवणी चमचमीत जेवणाचा आस्वाद ते पर्यटकांना देतात. त्यांचा या केंद्राला लवकरच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून निवास, न्याहारी व भोजनाची परवानगी मिळणार आहे.
उगवेकर या मुख्य उसाची शेती करत असूनही शेती करतानाच इतर पालेभाज्याही घेतात. याचबरोबर कोंबडीपालन, गांडूळखत, शेणखत निर्मितीचाही पूरक व्यवसाय करीत आहेत.

Web Title: Successful production of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.