विद्यार्थी करणार वणवामुक्तीचा जागर...

By Admin | Updated: January 5, 2015 23:19 IST2015-01-05T23:08:13+5:302015-01-05T23:19:11+5:30

वन खात्याचा पुढाकार : वणव्यामुळे जैवविविधता होतेय नष्ट, एनएसएसच्या विद्यार्थ्यांची घेणार मदत

Students will get rid of unnecessary ... | विद्यार्थी करणार वणवामुक्तीचा जागर...

विद्यार्थी करणार वणवामुक्तीचा जागर...

सुभाष कदम - चिपळूण -कोकणात वणव्यामुळे जैवविविधतेचे व झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामध्ये झाडांच्या अनेक जाती आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. आतापासूनच वणवे लागण्यास सुरुवात झाली असल्याने वन विभागाने त्यावर टाच आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिर सुरु झाले आहे. या शिबिराच्या माध्यमातून वणवा मुक्तीचा नारा देण्याची शक्कल वन विभाग व पोलीस अधीक्षक यांनी लढविली आहे. चिपळूण येथे टायगर सेलची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे व विभागीय वन अधिकारी अमर साबळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, श्रमसंस्कार निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांना वणवा मुक्तीबाबत धडे देण्याची लेखी सूचना पाठविण्याचे ठरले आहे.
आघाडी सरकारचे माजी वनमंत्री पतंगराव कदम व वन राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी गावागावातील वणवे कमी व्हावेत, जैवविविधतेचे रक्षण व्हावे, यासाठी वणवामुक्ती अभियान राबविले होते. या अभियानाच्या माध्यमातून बक्षीस देण्याची योजनाही पुढे आणली होती. परंतु, त्या योजनेच्या माध्यमातून फारसे काही साध्य झाले नाही. विशेष म्हणजे अद्याप कडाक्याची थंडी पडत आहे. अधूनमधून पाऊस पडत आहे. सकाळी पडणाऱ्या दवामुळे गवत ओले झाले असते. असे असताना मार्गताम्हाणेसारख्या भागात राजरोस गवत पेटवून दिले जात आहे. मार्गताम्हाणे ते तनाळी दरम्यानच्या रस्त्यावर माळरान पेटवून दिल्यामुळे झाडेझुडपे जळून खाक झाली आहेत. शासन स्तरावर कितीही चांगले निर्णय झाले तरी जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत वणवामुक्ती हा प्रश्न कायम भेडसावणार आहे.
वन खाते आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आता पुढाकार घेतल्याने काहीअंशी यात फरक पडेल, अशी अपेक्षा ठेवली तरी जोपर्यंत वणवा लावणारे स्वत:हून परावृत्त होत नाहीत, तोपर्यंत हे असेच चालत राहणार आहे. यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.
यापूर्वी फसलेल्या वनमुक्त अभियानात युवा शक्ती जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर वन संवर्धन व वन्य प्राण्यांचे संरक्षण होईल. नष्ट होत चाललेल्या अनेक प्राण्यांच्या प्रजाती व औषधी वनस्पती तग धरुन राहतील. अन्यथा भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास होईल. राज्य शासनाने शासन स्तरावर वनसंवर्धन ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे लावण्यासाठी सांगितले जात आहे. तशी लागवड करुनही घेतली जात आहे. कोकणात जुनी झाडे तोडतानाच नवीन लागवड मोठ्या प्रमाणवार उभी राहात आहे. सध्या कोकणात फळझाडांचीही लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतु, वणव्यामुळे सर्वसामान्य बागायतदार, शेतकरी हैराण झाला आहे. यासाठी वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


ठेवा जपावा....
कोकणातील शेतकरी राबराब राबून उन्हातान्हाची पर्वा न करता लागवड करतो. लागवडीतून चांगले पैसे मिळतील, यासाठी आंबा, काजू, नारळ, चिकू यांसारख्या फळझाडांची रोजगार हमी योजनेतून लागवड केली जाते. शासन त्यासाठी १०० टक्के अनुदान देते. परंतु, लागवड केलेली झाडे नतद्रष्ट व्यक्तीमुळे जळून खाक होतात. वणवे लावणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे रवींद्र घोले यांनी सांगितले.



सहकार्य हवे
वणवे लावून आपण आपलेच नुकसान करत आहोत. याची जाणीव वणवा लावणाऱ्याला नसते. सहज जाता जाता सिगारेट किंवा विडी पेटवून टाकली जाते. या लहान घटनेमुळे मोठा अनर्थ होतो. याची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी. नागरिकांनी स्वत:हून वणवामुक्तीसाठी प्रयत्न केले; तरच ही योजना यशस्वी होईल, असे परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील यांनी सांगितले.


जागृती हवी : साबळे
वणव्याच्या दुष्परिणामांविषयी ग्रामस्थांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सेवाभावी वृत्तीने काम करतील. वणवा लागू नये, यासाठी गावागावात जाऊन प्रयत्न करतील. वणवा मुक्तीबाबत निवासी शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. तरुणांमध्ये एक उत्साह असतो. त्याचा लाभ उठविला जाईल. या मोहिमेत जे विद्यार्थी चांगले काम करतील, त्यांची नावे महाविद्यालयाकडून वन विभागाला कळविण्यात येतील. अशा विद्यार्थ्यांचा वन खात्यातर्फे गौरव करण्यात येईल.

 

Web Title: Students will get rid of unnecessary ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.