सावंतवाडी : सावंतवाडीत घरातून महाविद्यालयाला निघालेल्या विद्यार्थ्याला चक्कर आल्याने तो रस्त्यावर कोसळून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत मुलाचे नाव कौस्तुभ प्रवीण पेडणेकर (१८, मूळ रा. शिरशिंगे, सध्या खासकीलवाडा, सावंतवाडी) असे आहे. तो कळसुलकर ज्युनियर महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. तो कुटुंबासहित खासकीलवाडा येथे भाड्याने राहत होता.कौस्तुभ हा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी उठून शाळेला जाण्यासाठी निघाला. तो घरापासून काही अंतर चालत आल्यावर त्याला एकदमच अस्वस्थ वाटू लागले आणि खासकीलवाडा येथील चार नंबर शाळेसमोर चक्कर येऊन कोसळला. अचानक घडलेल्या प्रसंगाने सगळेच घाबरले. लागलीच त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कौस्तुभ हा कळसुलकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी होता. तो बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता, अभ्यासात हुशार होता, त्याचे वडील कोल्हापूर येथे एका हॉटेलमध्ये काम करतात. तर त्याला छोटी बहीण आहे. गावात येण्या-जाण्याची अडचण असल्यामुळे त्याचे कुटुंब शहरात खासकीलवाडा येथे वास्तव्यास राहिले होते. या दुर्दैवी घटनेनंतर सगळ्यांनाच धक्काच बसला. घटनेची माहिती मिळताच अनेक मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती. तसेच अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.
चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थ्याचा रस्त्यातच मृत्यू, सावंतवाडीतील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 17:46 IST