सातुळी-बावळाटला वादळाचा फटका
By Admin | Updated: October 17, 2014 23:53 IST2014-10-17T23:16:39+5:302014-10-17T23:53:21+5:30
लाखोंचे नुकसान : अनेक घरांवर झाडे कोसळली; पावसाने भातशेती धोक्यात

सातुळी-बावळाटला वादळाचा फटका
ओटवणे : ओटवणे दशक्रोशीतील सातुळी- बावळाट या गावांना दुपारी मुसळधार वृष्टीसह वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. दुपारी तीन वाजता केवळ दहा ते पंधरा मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे बावळाट-मुलांडावाडी येथील उत्तम ठाकूर यांचे राहते घर, दुकान यावर दोन भले मोठे माड कोसळल्याने घर व दुकानांची पडझड होऊन सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले. काही घरांच्या पडझडीचे प्रकार घडल्याने लाखोंची हानी झाली आहे.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बावळाट- मुलांडावाडी येथील पार्वती राऊळ, गंगाबाई परब यांच्या घरांवर व शेत मांगरावर शिवन व फणसाचे झाड पडल्याने व वाऱ्यासह घराचे पत्रे उडून गेल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच भिंतींनाही भेगा पडून नुकसान झाले. सातुळी-बावळाट येथील पोलीसपाटील अरुण परब यांच्या घराचे छप्पर व पत्रे उडून गेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. जगन्नाथ परब, विजय परब, प्रवीण परब यांची वैयक्तिक मालकीची झाडे कोसळली व घरांवरही पडली. त्यामुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या वादळामध्ये साडेतीन लाखांहून अधिक नुकसान ग्रामस्थांना सोसावे लागले. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. पंचायत समितीचे सदस्य राघोजी सावंत, बावळाटचे सरपंच सूर्यकांत परब, उपसरपंच प्रभावती कानसे, पोलीसपाटील आबा परब, कांता पांगम, तलाठी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
कणकवली परिसरात मेघगर्जनेसह पाऊस
नवरात्रौत्सवानंतर गायब झालेल्या पावसाने आज, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्गात सध्या भातकापणीचा हंगाम सुरू असून पावसामुळे भातशेतीचे नुकसान होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली. त्याचबरोबर विजा चमकत होत्या. त्यामुळे भातकापणी सुरू असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दहा दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यात विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच मागील आठवड्यात कणकवली टेंबवाडीनजीक एका घरावर वीज पडली होती. पावसाळी हंगामातील भातशेती सध्या कापणीला योग्य आहे. त्यातच निवडणूकही आटोपल्याने शेतकरी सध्या भातकापणीमध्ये मग्न आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत आॅक्टोबर हिट जाणवत असल्याने उशिरा लावणी केलेली भातशेतीही कापणीस योग्य झाली आहे. मात्र, अचानक कापणी करून ठेवलेल्या अथवा कापणीस योग्य असलेल्या भातरोपांवर पडत असलेल्या पावसाने पाणी पडून भाताची केसर झडून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.