नारायण राणेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष; सावंतवाडीतील लढतही होणार रंगतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:20 PM2019-08-01T15:20:35+5:302019-08-01T15:21:06+5:30

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

State's attention to the role of Narayan Rane | नारायण राणेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष; सावंतवाडीतील लढतही होणार रंगतदार

नारायण राणेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष; सावंतवाडीतील लढतही होणार रंगतदार

Next

- महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आजच्या घडीला शिवसेना आणि भाजपाची युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी जाहीर केले असले तरी तळागाळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते जणू मान्य नसल्यासारखेच ते कामाला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे गेल्या पंधरा- वीस वर्षात कायमच चर्चेतील नेतृत्व असून ते आगामी विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात? मालवण-कुडाळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की दुस-या कोणाला उतरवितात, याकडे सध्या संपूर्ण सिंधुदुर्गसह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्याच्या राजकारणात कायमच केंद्रबिंदू राहिलेल्या राणेंचा २0१४ च्या निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघातून पराभव झाला आणि जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे बदलून गेले. त्यामुळे आता २0१९ च्या निवडणुकीत राणे निश्चितच ‘कमबॅक’ करतील. अशी आशा कार्यकर्त्यांनासह पदाधिका-यांना वाटत आहे. त्यामुळे राणेेंनी याच मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी मागणीही कार्यकर्ते व पदाधिकारी करीत आहेत. नारायण राणेच विद्यमान आमदार वैभव नाईक यांना लढत देऊन विजयश्री खेचून आणू शकतात, अशी धारणा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आहे. अन्यथा नाईक यांनी गेल्या सात ते आठ वर्षात कुडाळ-मालवण या आपल्या मतदार संघात चांगली बांधणी केली आहे. नाईक हे मतदार संघातील प्रत्येक घडामोडीत भाग घेत असतात. त्यामुळे नाईक यांच्या विरोधात राणेच कडवी झुंज देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी स्वत: निवडणूक लढवावी, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी आहे.

राणे हे सध्या भाजपाकडून राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना आणि भाजप यांची युती जर विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर ते काय भूमिका घेणार, हा प्रश्नच आहे. स्वाभिमान पक्ष संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले असल्याने ते खासदारकीवर पाणी सोडणार की खासदार असतानाही विधानसभा निवडणूक लढविणार? की भाजपाशी फारकत घेणार? असे अनेक प्रश्न येथील जनतेसह राज्यातील सर्वच राजकीय विश्लेषकांना पडले आहेत. 

त्यातच राणे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन १६ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमाला राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना बोलाविले आहे. तसे पाहता या पुस्तकाची प्रस्तावना स्वत: पवार यांनीच लिहिलेली आहे. तर राणे यांचे पवार यांच्यासोबत कायमच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. 

१६ ऑगस्टच्या राणे यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नसल्याची वृत्ते प्रसारमाध्यमांमधून दाखविली जात आहेत. त्याचबरोबर राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर भाजपा प्रवेशाच्यावेळी त्यांचे राजकीय विरोधक असणा-या शिवसेनेने वेळोवेळी आडकाठी आणली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात राणे यांनी माजी खासदार नीलेश राणेंना निवडणूक रिंगणात उतरविले होते. वास्तविक राणे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. असे असतानाही त्यांनी युतीच्या उमेदवाराविरोधात आपला लढा येथे कायम ठेवला होता.

विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती कायम राहिल्यास राणे आता कोणती भूमिका घेणार, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न कायम आहे. जोपर्यंत शिवसेना आणि भाजपा युतीची स्पष्टोक्ती होत नाही, तोपर्यंत राणेंची पुढची खेळी स्पष्ट होणार नाही.  राणे यांनी अगोदरच जाहीर केले आहे की, स्वाभिमान पक्ष राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे त्यांची ती भूमिका स्पष्ट असली तरी राणे स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार की नाही, हे मात्र अजूनही पूर्णपणे गुलदस्त्यातच आहे.

आमदार नितेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील एका कार्यक्रमात नारायण राणेच कुडाळ-मालवणमधून उमेदवार असतील असे जाहीर वक्तव्य केल्यामुळे त्याबाबतच्या बातम्या सर्वत्र पहायला मिळाल्या. मात्र, नीतेश राणे यांनी मांडलेली ही भूमिका कुडाळ-मालवणमध्ये इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांना थंड करण्यासाठी तर नव्हती ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला अजूनही दोन महिन्यांचा कालावधी आहे. मात्र, त्यामुळे आधीच उमेदवार जाहीर करून नाराजी ओढवण्यापेक्षा आता राणे यांचेच नाव जाहीर झाल्यास सर्वच बंडोबा आपोआप थंड होतील, असाही त्यामागे एक कयास असण्याची दाट शक्यता आहे.

कुडाळप्रमाणे सावंतवाडी मतदार संघातील राजकीय लढाई प्रतिष्ठेची होणार असून, पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदार संघात घेरण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांकडून एकत्र येण्यासाची रणनीती आखली जात आहे. त्यातच शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात माजी आमदार राजन तेली यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने केसरकर आता त्यांच्या तिसºया निवडणुकीत विरोधकांचे चक्रव्यूह कशा रितीने भेदतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

स्वाभिमान लढणार स्वतंत्र
नारायण राणे यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमान या पक्षाची स्थापना केली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे कोकणातील सर्व जागा स्वाभिमान स्वतंत्ररित्या लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राणे आता आपल्या उमेदवारांसाठी कोणाचा पाठिंबा मिळवितात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बबन साळगावकरांची  भूमिका ठरणार लक्षवेधी

दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केसरकरांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे ते कमालीचे चर्चेत आले आहेत. त्यामुळे ते जी भूमिका घेणार ती अतिशय लक्षवेधी ठरणार आहे.

उपरकर टाकत राहणार  राजकीय बाँबगोळे

मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर हे प्रत्येक राजकीय घडामोंडीकडे लक्ष ठेवून असतात आणि ते नेहमीच राजकीय बाँबगोळा टाकण्यात माहीर म्हणून ओळखले जातात.

सर्व शिलेदार एकेकाळी नारायण राणेंचेच

सावंतवाडी मतदार संघातून भाजपाकडून इच्छुक असलेले आणि तसे कामाला लागलेले माजी आमदार राजन तेली, कुडाळ-मालवणमधून इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि काँग्रेसकडून कुडाळ-मालवणसाठी इच्छुक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर हे सर्वच जण एकेकाळचे नारायण राणेंचे कट्टर समर्थक आणि शिलेदार म्हणून ओळखले जायचे. यातील राजन तेली आणि काका कुडाळकर आता राणेंसोबत नाहीत. सर्व राणेंचेच शिलेदार भविष्यात विविध पक्षांमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ‘सेकंड फळी’ म्हणून पाहिले जात आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्यास भाजपाला नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील तीनपैकी कणकवलीची एकच जागा मिळणार आहे. तर माजी आमदार तेली यांनी सावंतवाडीत जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे युती झाल्यास तेली काय भूमिका घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.शिवसेना-भाजपची युती झाल्यास भाजपाला नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील तीनपैकी कणकवलीची एकच जागा मिळणार आहे. तर माजी आमदार तेली यांनी सावंतवाडीत जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे युती झाल्यास तेली काय भूमिका घेतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: State's attention to the role of Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.