राज्य ‘हॉट’, कोकण ‘कूल’ पर्यटन हंगाम होणार फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:27 IST2019-04-28T23:27:53+5:302019-04-28T23:27:58+5:30
मनोज मुळ््ये । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली असली ...

राज्य ‘हॉट’, कोकण ‘कूल’ पर्यटन हंगाम होणार फुल्ल
मनोज मुळ््ये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली असली तरी त्या तुलनेत कोकण अजून कूल आहे. त्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळतील, अशी अपेक्षा आहे. कोकणाबाहेरील जिल्ह्यांचे तापमान ४0 अंशाच्याही पुढे गेले आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांसाठी कोकणातील वातावरण थंड आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानातही कोकणातील पर्यटन वाढण्याची अपेक्षा आहे. एका अर्थाने तीव्र उन्हाचा त्रास सहन करणाऱ्यांना कोकणातील हवामानाकडून पर्यटनाचे निमंत्रणच दिले जात आहे.
परीक्षा संपल्यानंतर पर्यटनाचा हंगाम लगेचच सुरू होतो. यावेळी मात्र निवडणुका असल्यामुळे हा हंगाम काहीसा लांबला आहे. १३, १८, २३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. यातील तीन टप्पे पूर्ण झाले आहेत आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुका सोमवार २९ रोजी होत आहेत. निवडणुकांमुळे बहुतांश सरकारी कर्मचारी कामातच अडकून पडले आहेत. मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या सुरू झाल्या तरी पर्यटकांचे आगमन झालेले नाही. हॉटेल व्यावसायिकांकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील बुकींगबाबत तसेच १५ मे नंतरच्या बुकींगबाबत राज्यभरातून विचारणा झाली आहे. त्यामुळे या दोन टप्प्यांवर पर्यटकांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विचार केला तर सध्या ३५ ते ३८ अंश इतके तापमान झाले आहे. कोकणच्या दृष्टीने पारा भडकलेलाच आहे. कोकणासाठी हे तापमान अधिक आहे. मात्र, महाराष्ट्रात इतर अनेक जिल्ह्यात पारा ४0 ते ४२ अंशापुढे गेला आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीतील तापमान कमीच आहे.
आताच्या दिवसात समुद्राकडून वाहणारे वारे या उन्हाची तीव्रता काहीशी कमी करतात. त्यामुळे कोकण अजून इतरांच्या मानाने थंड आहे.
राज्यातील पर्यटकच अधिक
सर्वसाधारणपणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येणाºया पर्यटकांपैकी ७५ टक्के लोक महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतूनच येतात. उर्वरित लोक राज्याबाहेरील असतात. कोकणात येणाºया पर्यटकांमध्ये महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमधील लोकांचेच प्रमाण अधिक असल्याने आणि तेथील तापमान कोकणापेक्षा अधिक असल्याने त्यांची पावले कोकणाकडे वळतील, असे पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना अपेक्षित आहे.