कशेडी घाटातील रुंदीकरणाला गती

By Admin | Updated: December 29, 2014 23:55 IST2014-12-29T22:19:32+5:302014-12-29T23:55:10+5:30

मुंबई-गोवा महामार्ग : ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप, वर्षभर रखडलेले काम प्रगतीपथावर

Speed ​​of width in the Kashidi ghat | कशेडी घाटातील रुंदीकरणाला गती

कशेडी घाटातील रुंदीकरणाला गती

रत्नागिरी : खेड तालुक्याच्या कशेडी घाटामधील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सन २०१३पासून सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर असून, आठ गावांतील शेतकऱ्यांना मालकी जमिनींच्या उत्खननाच्या मोबदल्यापासून वंचित ठेवले जात असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत. सुरूवातीच्या काळात रेंगाळलेले हे काम तब्बल एक वर्षानंतर सुरू झाले असून, आता रस्ता रुंदीकरण व गटारांच्या काँक्रीटीकरणाने वेग घेतला आहे.
कशेडी घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी जेसीबी व पोकलेनसारख्या यंत्रणेचा वापर करून माती व दगडाची वाहतूक अन्यत्र करण्यात येत आहे. या कामाची कोट्यवधी रूपयांची निविदा काढण्यात आली आहे. मात्र, महसूल विभागाला गौण खनिज उत्खननापोटी मिळणारी रॉयल्टी संबंधित ठेकेदाराने अदा केलेली नाही.
सुपरवायझर असलेले शाखा अभियंता येरूणकर यांनी हे काम राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीवरच सुरू असल्याचे सांगून रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटर दुतर्फा जमीन ही राष्ट्रीय महामार्ग होण्यावेळीच शेतकऱ्यांना मोबदला देऊन अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती दिली.
या वादानंतर तब्बल एका वर्षाच्या विश्रांतीनंतर तेच काम पुन्हा सुरू झाले आहे. माती उत्खननानंतर रुंद झालेल्या डोंगर बाजूच्या साईडपट्टीवर डबर फोडून रूंदीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच बाजूला काँक्रीटच्या गटाराचे बांधकाम सुरू झाले आहे. मात्र, तीव्र वळणांचा घाटरस्ता सरळ करण्याचा प्रयत्न अपेक्षित असताना तीव्र वळणाचा धोका कायम ठेवूनच रुंदीकरण होत असल्याने कशेडी घाट चढणाऱ्या वाहनांना घाट उतरणारी वाहने अचानक समोर आल्याने दरीकडे जाण्यापेक्षा रस्त्यावर राहण्याच्या प्रयत्नात अपघाताला सामोरे जाणे भाग पडत आहे. केवळ चार ते सहा इंचाचा डबराचा थर देऊन त्यावर निकृष्ट दर्जाची खडी अंथरून कमी दाबाचा रोडरोलर फिरविण्यात येत आहे. अवजड वाहने या नवीन रस्त्यावरून गेल्यास धोका संभवतो. यासंदर्भात, यापूर्वीही असे अपघात कशेडी घाटात झाल्याच्या घटनांकडे महामार्ग बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. कशेडी घाटात सुरू असलेले रुंदीकरणाचे काम केवळ मंजूर निधी परत जाऊ नये, या हेतूने ठेकेदाराकडून घीसाडघाईत पूर्ण करून घेतले जात असल्याने या कामाच्या ठिकाणी शाखा अभियंता दर्जाचा एकही अधिकारी गुणवत्ता व दर्जा नियंत्रणासाठी उपलब्ध नाही.
उत्खननातील माती भरावासाठी वापरण्याच्या कामाप्रमाणे घाटातील डोंगरातील दगडांचा साईडपट्टीत दाबून रस्ता रुंदीकरणासाठी वापर केला जात आहे. यामुळे महसूल विभागाला चुना लावण्याप्रमाणेच बांधकाम विभागालाही चुना लावण्याचे काम यामुळे झाले आहे. कशेडी घाटातील रस्त्यांची तीव्र वळणे नियंत्रित करण्याऐवजी वळणांचा धोका कायम ठेऊन केवळ रस्ता रुंदीकरण केले जात आहे. या धोक्याची तीव्रता वाढवण्यासाठी तीव्र वळणांवर डोंगर बाजूने गटारांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. या वळणांवर वाहने नियंत्रित न झाल्यास काँक्रीटच्या गटारांतून टायर अडकून वाहने रूतण्याचा व कलंडण्याचा धोका वाढणार आहे. (शहर वार्ताहर)

अधिक जमिनीवर उत्खनन
उत्खननामध्ये धामणदिवी, भोगाव खुर्द, भोगाव बुद्रुक, काळपवाडी दत्तवाडी, पार्टेवाडी, येलंगवाडी, भरणेवाडी आदी आठ गावे व वाड्यांतील खातेदार शेतकऱ्यांच्या डोंगरजमिनींचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता संपादित जमिनींपेक्षा अधिक जमिनींवर उत्खनन करून वळणे काढण्याचे काम सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.


कशेडी घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी जेसीबी व पोकलेनसारख्या यंत्रणेचा वापर.
कामाची कोट्यवधी रूपयांची निविदा.
तब्बल एका वर्षाच्या विश्रांतीनंतर तेच काम पुन्हा सुरू.
माती उत्खननानंतर रुंद झालेल्या डोंगर बाजूच्या साईडपट्टीवर डबर फोडून रूंदीकरणाचे प्रयत्न सुरू.
महसूल विभागाप्रमाणेच बांधकाम विभागालाही चुना लावण्याचे काम.

Web Title: Speed ​​of width in the Kashidi ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.