पावसाळ्यापूर्वी कणकवलीतील सांडपाण्याची समस्या मार्गी लावा, ठेकेदाराला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:01 IST2020-05-21T13:56:49+5:302020-05-21T14:01:12+5:30
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही घरात गटारातील पाणी गेले तर नागरिकांच्या उद्रेकाला महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग ठेकेदार जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला .

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम तसेच गटार व्यवस्थेची पाहणी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसह केली.
कणकवली : पावसाळा सुरू होण्यापूर्वी कणकवली शहरातील सांडपाणी व्यवस्थेची समस्या मार्गी लावा, असे निर्देश कणकवली नगरसेवकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच महामार्ग ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही घरात गटारातील पाणी गेले तर नागरिकांच्या उद्रेकाला महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग ठेकेदार जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला .
कणकवलीचे उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांच्यासह गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, मेघा गांगण, अॅड.विराज भोसले आदींनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी तसेच दिलीप बिल्डकॉन कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत शहरातील महामार्ग चौपदरीकरण काम तसेच गटार व्यवस्थेची पाहणी केली .
शहरातील एसटी वर्कशॉप, उबाळे मेडिकल, अॅड. उमेश सावंत निवासस्थान, अप्पासाहेब पटवर्धन चौक, गांगोमंदिर, स्टेट बँक समोरील परिसरातील नाला येथे सांडपाणी साचून राहण्याची समस्या निर्माण होते. त्यातच शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी बिकट अवस्था निर्माण होते .
३१ मे पूर्वी समस्यांचे निराकरण होईल
नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाण्याचा धोका निर्माण होतो. यावर्षी ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी पुढील आठ दिवसांत उपाययोजना करा. यात दिरंगाई झाली तर आम्ही जबाबदार नाही असा इशारा देखील उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आणि बंडू हर्णे यांनी यावेळी दिला.
यावेळी ३१ मे पूर्वी कणकवली शहरातील सर्व समस्यांचे निराकरण होईल, अशी ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी दिल्याची माहिती नगरसेवक संजय कामतेकर यांनी दिली.