औषध भांडारासह सोसायटी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2015 01:17 IST2015-07-05T01:15:45+5:302015-07-05T01:17:40+5:30

सावंतवाडीत चोरीसत्र सुरूच : पोलिसांच्या मागचे ग्रहण सुटेना

Society collapsed with a dump store | औषध भांडारासह सोसायटी फोडली

औषध भांडारासह सोसायटी फोडली

सावंतवाडी : सावंतवाडी पोलिसांच्या मागचे चोरीचे ग्रहण काही होईना सुटता सुटेना अशी अवस्था झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी भरचौकातील एका कंझ्युमर्स सोसायटीसह औषध भांडार फोडले. मात्र, यातून मोठी रक्कम चोरीला गेली नसली, तरी चोरीची मालिका सुरूच आहे. या चोरीबाबत सावंतवाडी पोलिसांत रीतसर माहिती दिली असून, उशिरापर्यंत याची नोंद करण्यात आली नव्हती.
सावंतवाडी शहरात गेले दोन दिवस चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत बंद फ्लॅट व दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच ठेवले असून, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत शहरातील मध्यवर्ती भागात असलेले बांदेकर यांचे औषधांचे दुकान फोडले. यावेळी चोरट्यांनी शटर उघडण्यासाठी दगड तसेच कटरचा वापर करून आतमध्ये प्रवेश केला. आपली कोणाला चाहूल लागू नये म्हणून त्यांनी आतील वीजपुरवठा खंडित करून काड्यापेटीच्या साहाय्याने पैसे लंपास केले. यातून मोठी रक्कम त्यांच्या हाती लागली नसली, तरी औषध दुकानातील चिल्लर लंपास केली आहे. शहरातील गांधी चौकातील कंझ्युमर्स सोसायटीमध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी शटर उघडले, परंतु आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना कोणीतरी पाहिल्याने शटर उघडण्याचा कटर तसेच अन्य साहित्य तिथेच टाकून त्यांनी पळ काढला. शहराच्या मध्यवर्ती भागात ज्या ठिकाणी पोलीस व नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी चोरट्यांनी या चोऱ्या करून धुमाकूळ घातला आहे. शहरातील नागरिक तसेच दुकानदारांच्या मनातही भीतीचे वातावरण पसरले आहे. कंझ्युमर्समध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजताच अध्यक्ष प्रमोद गावडे, उपाध्यक्ष उमाकांत वारंग यांनी दुकानाची कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी केली.
चोरीबाबतची माहिती औषध भांडारचे मालक विद्यानंद बांदेकर यांनी पोलिसांत दिली असून, पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्यासह अधिकाऱ्यांनी औषध भांडार तसेच कंझ्युमर्स सोसायटीची पाहणी केली. मात्र, उशिरापर्यंत कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. पोलीसही सततच्या चोऱ्यांमुळे चक्रावून गेले आहेत. चोरटे पोलिसांपेक्षा सरस असल्याचेच यातून दिसून येत आहे.
चोरटे पोलिसांच्या एक पाऊल पुढे
सावंतवाडीत सतत चोरी होत असल्याने चोरट्यांपुढे पोलिसांनी हात टेकले असून, गस्त असूनही चोऱ्या होतातच कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरटे पोलिसांच्याही एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.
कणकवलीत हवालदाराचे घर फोडले
शहरात अकरा ठिकाणी घरफोड्यांची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री नाथ पै नगरात पोलीस हवालदार राहत असलेले घर फोडण्यात आले. मात्र, या घरफोडीतून नेमका कोणता ऐवज चोरीस गेला याबाबत पोलिसांकडे माहिती उपलब्ध नाही.
नाथ पै नगरात चंद्रकांत राणे यांच्याकडे हवालदार एस. एस. सकपाळ भाड्याच्या खोलीत राहतात. ते गेले दोन महिने आजारी असल्याने पंढरपूर येथे आपल्या घरी आहेत. त्यामुळे त्यांची खोली दोन महिने बंद होती. शुक्रवारी रात्री अज्ञाताने दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. आतील शोकेसचे कपाट विस्कटून टाकण्यात आले.
मंगळवारी रात्रीच शहरातील अकरा ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार नोंद नव्हती.

Web Title: Society collapsed with a dump store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.