कुणकेश्वरात ४0 कुटुंबांचा एकच गणपती
By Admin | Updated: September 26, 2015 00:15 IST2015-09-25T23:47:32+5:302015-09-26T00:15:03+5:30
आगळा-वेगळा गणेशोत्सव : नाभिक समाजाकडून एकात्मतेचा संदेश

कुणकेश्वरात ४0 कुटुंबांचा एकच गणपती
कुणकेश्वर : दक्षिण कोकणची काशी असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील नाभिक समाजाचा प्राचीन परंपरा असणारा आगळा वेगळा गणेशोत्सव मोठ्या थाटात पार पडतो. ४० कुटुंबांचा एकच गणपती आहे. पिढ्यानपिढ्या चालणारी ही प्रथा अगदी आजही अविरतपणे चालू आहे. बदलत्या विभक्त कुटुंब पद्धतीत आजही एकात्मतेचा संदेश देणारा हा उत्सव जाणीवपूर्वक विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रेम, बंधुभाव, एकता व गुणांचा विकास आदी गोष्टी जोपासत असतो. त्यासाठी दररोज विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. त्यामध्ये रांगोळी, संगीत खुर्ची, कॅरम, बुद्धीबळ, रेकॉर्ड डान्स आदी स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.
मुंबईसारख्या ठिकाणी ज्या पद्धतीने सार्वजनिक उत्सव पार पडतात अगदी त्याच पद्धतीने मोठ्या जल्लोषात नाभिक समाज हा गणेशोत्सव साजरा करत असतो. एकच गणपती असल्याने कुटुंबातील प्रत्येकाच्या अंगात एक वेगळाच उत्साह असतो. बाप्पाच्या सेवेसाठी प्रत्येकजण तत्पर असतो. बाप्पाच्या सेवेमध्ये आपलाही हातभार असावा यासाठी प्रयत्न करत असतो.
या नाभिक समाजाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे हा समाज केवळ गणेशोत्सवात एकत्र नसतो तर वर्षभरातून येणाऱ्या प्रत्येक सणांमधून हा समाज आपल्या एकात्मतेचा आदर्श इतरांना दाखवत असतो. त्यामध्ये या सर्व ४० कुटुंबांमध्ये मिळून एकच तुळशी वृंदावन आहे. पाडव्याला एकच गुढी उभारली जाते. नवरात्र उत्सव सुद्धा एकत्रितपणे साजरा केला जातो.
त्याचप्रमाणे या सर्व कुटुंबांचे मिळून एक मंदिर अगदी सर्व घरांच्या मध्यावरती आहे. या मंदिराला वाघद्वार असे नाव आहे. यात सर्व कुटुंबांचे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. कुणाच्याही कुटुंबात विभक्तपणे धार्मिक कार्यक्रम होत नाहीत. समाजात कितीही अडचणी आल्या तरी अकरा दिवस गणेशाची सेवा केली जाते.
या उत्सवासाठी नाभिक समाजाची मुंबईस्थित चाकरमानी मंडळींबरोबर माहेरवाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
चव्हाणांच्या या राजाचे मोठ्या थाटामाटात ढोलताशे वाजवून, सुस्वर गाणी म्हणत कुणकेश्वर समुद्रकिनारी विसर्जन केले जाते. सर्वांना भुरळ घालणारा हा चव्हाणांचा गणेशोत्सव मोठ्या थाटात चालतो. भाविकांनी एकदातरी कुणकेश्वर क्षेत्री येवून हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवायला हवा. (वार्ताहर)