सिंधुदुर्ग : शौचालयाचे अर्धवट बांधकाम, वेंगुर्लेतील कातकरी समाजवस्तीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:26 IST2018-06-05T17:26:24+5:302018-06-05T17:26:24+5:30
वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचारचा टॉवर असलेल्या व कातकरी समाजाची वस्ती असलेल्या भागात तीन महिन्यांपूर्वी दोन अर्धवट शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, शौचालय सीटच्यावर बांधकाम केलेले नसल्याने त्याचा उपयोग कोणी करत नाही.

कातकरी वस्तीत अर्धवट स्थितीत बांधलेले शौचालय.
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचारचा टॉवर असलेल्या व कातकरी समाजाची वस्ती असलेल्या भागात तीन महिन्यांपूर्वी दोन अर्धवट शौचालये बांधण्यात आली आहेत. मात्र, शौचालय सीटच्यावर बांधकाम केलेले नसल्याने त्याचा उपयोग कोणी करत नाही.
ज्यांनी हे काम करून दिले, त्यांनी कातकऱ्यांना शौचालयासाठी खड्डा व शौचालयावरील छत तुमचे तुम्हीच करून ते वापरण्याचा सल्ला दिला होता. कातकऱ्यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेकडून व्यक्ती आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, वेंगुर्ले नगरपरिषदेने त्या कामाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील निमुसगा दीपगृहानजीकच्या दूरसंचार टॉवरनजीक गेली अनेक वर्षे वीस कातकरी कुटुंबे असलेली वसाहत आहे. या वसाहतीत पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमच असते.
या भागात सार्वजनिक विहीर नाही की नगरपरिषदेची बोअर विहीर, नळपाणी, अधिकृत घरे वा वस्ती नसल्याने नळपाणी योजनेची पाईपलाईन गेलेली नाही. त्यामुळे दाभोसवाडा येथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणावे लागते.
कातकरी समाजाच्या या वस्तीत तीन महिन्यांपूर्वी कुणीतरी दोन शौचालये सीटपुरती बांधकाम करून दिली.
त्यासाठी ड्रेनेजकरिता खड्डा सुध्दा मारलेला नाही व शौचालयास त्या सीटवर बसणाऱ्या व्यक्ती आडोसा राहील, अशा भिंतीही बांधलेल्या नाहीत. हा खड्डा व भिंती स्वत:च तुम्ही करावयाचा आहे, असे शौचालय बांधून देणाऱ्याने स्पष्ट केले.
ते नगरपरिषदेचे माणूस होते, असे कातकरी महिला सावित्री वसंत पवार हिने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या उघड्या शौचालयाचा फोटो व्हॉटसअपवर व्हायरल झाल्याने वेंगुर्ले शहरात चर्चेला उधाण आले आहे. त्याअनुषंगाने स्वच्छता अभियानात क्रमांक पटकाविणाऱ्या नगरपरिषदेने देशस्तरीय स्पर्धेसाठी ते काम करून पैसे खाल्याचा आरोपही ऐकू येत आहे.
मात्र, या कामाबाबत वेंगुर्ले नगरपरिषदेतील एकाही नगरसेवकाला त्याची माहिती नाही. प्रशासनाचे प्रमुख मुख्याधिकारी व बांधकाम निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता ते काम आम्ही केलेच नाही, त्यामुळे आमच्याकडून त्यावर खर्च करण्याचा प्रश्न येत नाही, असे स्पष्ट केले.