भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार, बांधकरवाडीवासीयांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 19:26 IST2018-11-25T19:26:09+5:302018-11-25T19:26:47+5:30

कणकवली शहरातील बांधकरवाडीवासीयांचे कोकण रेल्वे मार्गावरील भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे.

Sindhudurg News | भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार, बांधकरवाडीवासीयांमध्ये समाधान

भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार, बांधकरवाडीवासीयांमध्ये समाधान

कणकवली - कणकवली शहरातील बांधकरवाडीवासीयांचे कोकण रेल्वे मार्गावरील भुयारी पादचारी मार्गाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. साडेपाच तासांचा मेगाब्लॉक घेऊन कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदाराचे कामगार अशा २५० जणांनी मेहनत घेऊन १५ मीटर लांबीचा आणि अडीच मीटर  रुंदी व उंचीचा भुयारी पादचारी मार्ग तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांना या परीसरातून ये-जा करणे सोपे होणार आहे. या भुयारी पादचारी मार्गासाठी प्रीकास्ट पाच आरसीसी बॉक्स वापरण्यात आले आहेत. 

कणकवली शहरातील बांधकरवाडी भागातून कोकण रेल्वेचा मार्ग गेला आहे. या मार्गामुळे या भागाची विभागणी झाली होती. तेथील नागरिकांना कणकवली शहरामध्ये यायचे असेल तर मोठा वळसा घालावा लागत असे. त्यामुळे याठिकाणी पादचारी मार्ग व्हावा यासाठी बांधकरवाडीवासीय गेली अनेक वर्षे प्रयत्नशील होते. याबाबत नगरसेवक सुशांत नाईक यांनी ग्रामस्थांच्या या मागणीकडे खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर खासदार राऊत यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी भुयारी पादचारी मार्ग मंजूर करून घेतला होता. गतवर्षी त्यांच्याच हस्ते या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. 

कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील रिजनल मॅनेजर यू. एस. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजनल सिनिअर अभियंता नडगे यांच्या उपस्थितीत हे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी बुधवारी  रात्री १२.३० ते गुरुवारी सकाळी ६ असा साडेपाच तासांचा मेगाब्लॉक या मार्गावर घेण्यात आला. १५ मीटर लांबी आणि अडीच मीटर रुंदी व उंचीच्या या मार्गासाठी तेवढा भाग कापण्यात आला आणि तयार करण्यात आलेले ५ चौकोनी आरसीसी बॉक्स त्याठिकाणी ठेवण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूचा भराव पूर्ण करून कापलेल्या रेल्वे रुळावर प्लेटचा वापर करून गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पुणे-एर्नाकुलम ही पहिली एक्स्प्रेस त्यावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर सायंकाळपर्यंत रेल्वे रुळाचे वेल्डींग पूर्ण करून मार्ग ‘जैसे थे’ करण्यात आला. या कामासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च झाला आहे. 
या कामासाठी  बांधकरवाडीतील स्थानिक ग्रामस्थांनी कोकण रेल्वे प्रशासनास चांगले सहकार्य केले. हा भुयारी मार्ग पादचा-यांना ये-जा करण्यासाठी आहे. या मार्गामुळे  बांधकरवाडीवासीयांना आता शहरात येण्यासाठी किंवा परत घरी जाण्यासाठी सोय उपलब्ध झाली  आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Sindhudurg News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.